म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या वर्षी पाऊस लांबल्याने पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे शंभर टक्के भरलेली असतानाही या वर्षी ऑगस्ट महिन्यात गेल्या दहा वर्षांतील सर्वांत कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याची आग्रही मागणी जलंसपदा विभागाने केली असली तरी गणपती होईपर्यंत पाणीकपात करू नये, अशी भूमिका पुणे महापालिकेने घेतली आहे. मात्र, पाणीकपातीबाबत १२ ऑगस्टच्या दरम्यान पुढील बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या बैठकीत आठवडाभरात पडणाऱ्या पावसावर शहरात पाणीकपात करायची की नाही, याचा निर्णय होणार आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाणीकपातीबाबत त्यांच्या दालनात मंगळवारी दुपारी बैठकीचे आयोजन केले होते. उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त शान्तनू गोयल, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजिव चोपडे, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर आदी बैठकीस उपस्थित होते.

चोपडे यांनी सोमवारी ३ ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्त कुमार यांना पत्र पाठवून मुठा खोऱ्यांतील धरणांमध्ये गेल्या दहा वर्षांतील सर्वांत कमी असा ९.८२ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा असल्याचा दावा केला आहे. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी २७ जुलै रोजी घेतलेल्या बैठकीनुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी अत्यंत काटकसरीने वापरण्याची सूचना केल्याची माहिती चोपडे यांनी दिली आहे. त्यानुसार पाणीकपातीचा आग्रह चोपडे यांनी महापौरांच्या बैठकीतही धरला होता.

महापौर मोहोळ यांनी स्वत: हवाखान विभागातील ज्येष्ठ शास्त्रज्ञांशी संपर्क साधून पावसाच्या शक्यतेची माहिती घेतली. त्यानुसार येत्या आठवड्यात कमी दाबाने; तर पुढील आठवड्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पाऊस पडणार असल्याने पाणीकपातीची आवश्यकता भासणार नाही. तसेच, गणपती असल्याने शहरात पाणीकपात करणे योग्य नाही. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय घ्यावाच लागला तर तो गणपतीनंतर घ्यावा, अशी सूचना मोहोळ यांनी केली आहे.

१२ ऑगस्टच्या दरम्यान बैठक

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती; तसेच धरणातील पाणीसाठा याबाबतची माहिती बैठकीत देण्यात आली. सध्या धरणक्षेत्रात पाऊस पडत असून, पाणीसाठ्याची परिस्थिती सुधारेल, अशी आशा आहे. याबाबत आठवडाभरानंतर म्हणजे १२ ऑगस्टच्या दरम्यान बैठक आयोजित करून पाणीकपातीबाबत चर्चा करण्यात येईल. तोपर्यंत शहरात कुठलीही पाणीकपात करण्यात येणार नसल्याचे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार जर धरण क्षेत्रात चार ते सहा दिवस चांगला जोराचा पाऊस झाला तर धरणातील साठा मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा असल्याचे कुमार म्हणाले.

‘गणपतीनंतरच पाणीकपातीचा निर्णय’

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात चारही धरणांत जवळपास ९० टक्के पाणीसाठा होता. सध्याच्या परिस्थितीत धरणांमध्ये ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हवामान विभागातील डॉ. अनुपम कश्यपी या ज्येष्ठ शास्त्रज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत हलक्‍या स्वरूपाचा पाऊस; तर १५ ऑगस्टनंतर महिन्याच्या शेवटपर्यंत मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. धरणक्षेत्रात जवळपास १०४ टक्के पाऊस होऊ शकतो, असा वेधशाळेचा अंदाज आहे. त्यामुळे गणेशोत्सव होईपर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय बैठकीत घेतल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले. पुढील काळात परिस्थितीचा अंदाज घेऊन पावसाने ओढ दिली तर गणपतीपूर्वी बैठक घेऊन त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल, परंतु, सध्या तरी गणेशोत्सव संपेपर्यंत कोणत्याही प्रकारची होणार नाही, असे मोहोळ म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here