वृत्तसंस्था, इंदूर

भारत विरुद्ध श्रीलंका टी-२० क्रिकेट मालिकेतील पहिली गुवाहाटी लढत पावसामुळे वाया गेली. याचा अर्थ शिखर धवनला स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची एक संधी वाया गेली. फॉर्मात असलेल्या राहुलप्रमाणेच किंवा त्यापेक्षाही आपण सरस असल्याचे शिखर धवनला आता कामगिरीतून दाखवून द्यायचे आहे. धवनला ही संधी आज (मंगळवार) पुन्हा मिळेल जेव्हा भारत आणि श्रीलंका संघ मालिकेतील दुसऱ्या इंदूर टी-२० साठी आमने-सामने येतील.

धवन की राहुल?

धवन हा ३५ वर्षांचा आहे. ज्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अन् खासकरून आयसीसीच्या स्पर्धांमध्ये चमक दाखवत उपयुक्तता सिद्ध केली आहे. तुलनेत राहुल हा २७ वर्षांचा असल्याने वय त्याच्या हातात आहे असे म्हणता येईल. धवनने मात्र वेळीच कामगिरी करण्याचा सपाटा लावला नाही, तर तो संघाबाहेर फेकला जाऊ शकतो. डावखुऱ्या धवनचा ‘स्ट्राइक रेट’ हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटला साजेसा नाही. गेल्या काही मोसमांपासून त्याला फलंदाजीत संघर्ष करावा लागतो आहे, ज्यामुळे हा ‘स्ट्राइक रेट’ मंदावला आहे. यात दुरुस्ती करण्यास धवनला श्रीलंकेविरुद्धच्या दोन उर्वरित टी-२० पुरेशा आहेत. मात्र, हे वाटते तेवढे सोपे नाही. त्याचा सूर हरवला आहे. त्यात २०१९च्या क्रिकेट मोसमात झालेल्या दुखापतीनंतर धवनचे काम आणखी कठीण होऊन बसले आहे. या गेल्या मोसमात धवनने १२ लढतींमध्ये ११०च्या स्ट्राइक रेटने २७२ धावा केल्या आहेत. राहुलने मात्र धवनच्या दुखापतीमुळे मिळालेल्या संधीचे चीज करत धावांमध्ये सातत्य राखले. सहा डावांत त्याने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत.

श्रीकांतची स्पष्टोक्ती

बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष श्रीकांत यांनी धवनच्या चुकांवर थेट बोट ठेवत धवन आणि राहुलमध्ये तुलनाच नसल्याचे सांगितले. कारण राहुल हा धवनपेक्षा खूप सरस आणि पुढे आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात यंदाच्या मोसमात रंगणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी रोहित शर्मासह सलामीला राहुल हाच योग्य जोडीदार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने मात्र धवन आणि राहुल यांच्यापैकी एकाची निवड करणे खूप कठीण निर्णय असल्याचे सांगितले आहे. रोहितला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. ‘रोहित परतेल, तेव्हा आमचे काम कठीण होईल; कारण धवन हा अनुभवी फलंदाज असला तरी राहुल सध्या खूप छान खेळतो आहे. आम्हाला परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण मैदानात सर्वोत्तम अकरा उतरावेत, यासाठी आमचा कायम प्रयत्न असेल,’ असे विराटने पहिल्या गुवाहाटी टी-२०च्या पूर्वसंध्येला सांगितले होते.

तोच संघ?

गुवाहाटी टी-२०मध्ये एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. यावरून इंदूरला विराट अंतिम संघात बदल करणार नाही, असे दिसते आहे. तेव्हा त्या वेळी अंतिम अकरामध्ये असलेले वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव इंदूरलाही खेळण्याची शक्यता आहे. अन् तसे झाले तर चहल आणि रवींद्र जडेजा यांना राखीव खेळाडू म्हणून बाकावर बसावे लागेल. मनीष पांडे आणि संजू सॅमसन यांना मात्र सातत्याने राखीव खेळाडूची भूमिकाच बजावावी लागते आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्ड कप होतो आहे. मात्र, त्यादृष्टीने पांडे आणि सॅमसनला संधी मात्र दिली जात नाही. इंदूरला पावसाचे चिन्ह नाही. त्यामुळे दुखापतीतून परतलेल्या जसप्रीत बुमराहचा भेदक मारा मंगळवारी बघायला मिळेल.

दृष्टिक्षेप…

– इंदूरच्या होळकर स्टेडियमवर आतापर्यंत एकच टी-२० लढत पार पडली असून, ती लढतही भारत व श्रीलंका संघांतच पार पडली होती.
– त्यात रोहित शर्माने ४३ चेंडूंत ११८ आणि राहुल ४९ चेंडूंत ८९ धावा केल्या होत्या. अशा खणखणीत कामगिरीमुळे भारताने २० षटकांत ५ बाद २६० धावा केल्या होत्या. ही लढत भारताने ८८ धावांनी जिंकली होती.
– श्रीलंकेला गेल्या दहापेक्षा जास्त वर्षांत भारताविरुद्ध कसोटी, वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये मालिका जिंकता आलेली नाही. या वेळीही भारतावर सरशी साधण्यासाठी त्यांना असामान्य कामगिरी करावी लागेल.

वेळ : रात्री ७ पासून
स्थळ : होळकर स्टेडियम, इंदूर

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here