देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या किमतीच्या नव्या सूत्राला मंत्रिमंडळाने मंजुरी देण्यासोबतच सीएनजी आणि पाइप्ड स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींवर कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली. ठाकूर यांनी माहिती दिली की मंत्रिमंडळाने एपीएम गॅससाठी $४ प्रति एमएमबीटीयू आधारभूत किंमत मंजूर केली असून कमाल किंमत $६.५ प्रति mmbtu ठेवण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
मुंबई सीएनजी-पीएनजीच्या किमती
मुंबईत सीएनजीची किंमत प्रति किलो ८ रुपयांनी कमी होईल तर पीएनजीच्या प्रति युनिटसाठी ग्राहकांना ५ रुपये कमी मोजावे लागतील. मुंबईत सध्या सिएनजीची किंमत ८७ रुपये प्रति किलो आहे तर कपात केल्यावर ७९ रुपयांनी तर सध्या पीएनजीची किंमत सध्याच्या ५४ रुपयांपासून ४९ रुपये प्रति किलोवर घसरण्याची शक्यता आहे.
क्रूडशी लिंक होणार किंमती
नवीन सूत्रानुसार आता देशांतर्गत नैसर्गिक वायूची किंमत आता आंतरराष्ट्रीय हब गॅसऐवजी आयातित क्रूडशी जोडल्या जातील. तसेच घरगुती गॅसची किंमत आता भारतीय क्रूड बास्केटच्या जागतिक किमतीच्या मासिक सरासरीच्या १०% असेल. हे दर महिन्याला सूचित केले जाईल आणि याचा फायदा पीएनजी, सीएनजी, खत वनस्पती इत्यादींना होईल. त्यामुळे सर्वसामान्य घरगुती ग्राहक ते शेतकरी आणि वाहनचालकांना थेट फायदा होणार आहे.
आत्तापर्यंत दर असेच ठरवले जायचे
घरगुती नैसर्गिक वायूचे CNG मध्ये रूपांतर होते तर पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) म्हणजेच एलपीजी म्हणून देखील वापरले जाते. याशिवाय खतं बनवण्यासाठी तसेच वीज निर्मितीसाठी हा प्रमुख कच्चा माल आहे. आतापर्यंत सरकार दर सहा महिन्यांनी म्हणजे १ एप्रिल आणि १ ऑक्टोबरला नैसर्गिक वायूच्या किमती ठरवायची. मात्र, आता सीएनजी-पीएनजीच्या किमती दर महिन्याला निश्चित केल्या जातील.