नरेंद्र पाटील, : इच्छाशक्ती असेल तर संकट कितीही मोठं असलं तरी त्यावर लिलया मात करता येते, हे डहाणुतील एका पाच वर्षाच्या मुलीने दाखवून दिलं आहे. मध्यरात्री पुराच्या पाण्यात वाहून जात असताना या चिमुकलीने झाडाची फांदी गच्च धरून ठेवली आणि स्वत:चं संरक्षण केलं. सकाळी गावकऱ्यांनी पहाटे तिची सुखरूप सुटका केली. या घटनेनंतर या चिमुकलीच्या धाडसाचं कौतुक होत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे येथील नदी,नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. डहाणू तालुक्यातील शेणसरी येथेही नदीला पूर आला आहे. या नदीच्या किनारी राहणारी ममता विजय लिलका ही पाच वर्षाची मुलगी मध्यरात्री २ वाजता पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेली. पुराच्या पाण्याचा प्रवाह भयंकर असल्याने पाण्याबरोबर ती दूरवर वाहून जात असतानाच एका झाडाला धडकली. त्यामुळे ममताने प्रसंगावधान राखत झाडाच्या लोंबकळणाऱ्या फांदीला घट्ट पकडले. पहाटे सहा वाजेपर्यंत ती या फांदीला घट्ट पकडून होती. पाण्याचा प्रवाह भयंकर सुरू असतानाही जराही विचलित न होता तिने या फांदीला घट्ट धरून ठेवले. दुसरीकडे गावकरी ममताचा रात्रभर शोध घेत असताना त्यांना नदीत एका झाडाच्या फांदीला ती लोंबकळताना दिसली. त्याचबरोबर दोघातिघांनी नदीत उडी मारून ममताची सुखरूप सुटका केली.

दरम्यान, ममताला सायवन प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच डहाणूच्या तहसीलदारांनी आरोग्य केंद्रात जाऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली.

पिता-पूत्र वाचले

दुसरीकडे पालघर तालुक्यातील सफाळे जवळील टेभीखोडावे येथे पिता व पूत्र मोटरसायकलवरून घरी चालले होते. यावेळी रस्त्यावरील पाण्यातून वाट काढत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून चालले होते. याच सुमारास तेथून जात असलेल्या स्वप्निल राऊत, कल्पेश व प्रदीप भोईर यांनी या दोघांना बुडताना पाहिले आणि तात्काळ दोर आणून या पिता-पुत्रांना वाचवले.

पालघर जिल्ह्याला पावसाने पूर्ण रात्रभर झोडपले असून अनेक गावांमध्ये घरांत पाणी शिरले आहे. पावसामुळे रस्ते बंद पडले असून जिल्ह्यातील जवळपासनिम्म्याहून अधिक विद्यूत जनित्रे बिघडल्याने येथील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. अनेक गावांत पाड्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दोन ते तीन फूट पाणी चढले आहे, तर काही ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत. रस्त्यांची वाहून गेलेली माती शेतकऱ्याच्या शेतात गेल्याने रोपणी झालेल्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पालघर शहरातील टेम्भोडे येथे फुले नगरमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. पालघर शहरातील विष्णू नगर, लोकमान्य पाडा, घोलविरा आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने गरिबांच्या सामानसुमानाची पूर्ती वाट लागली असून कुठे आणि कसं रहायचं असा त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. नगर परिषदेने या वर्षी गटारे साफ न केल्यामुळे गटारी तुंबल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.

न्यायालयातील बाकड्यावर साप

पालघर न्यायालयातही गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून आलेला साप न्यायालयात शिरला असून एका बाकड्यावर वाटोळे करून बसल्याने अनेकांची घाबरगुंडी उडाली. तसेच न्यायाधीशांच्या निवासस्थानातही पाणी शिरल्याने घरातील सामानांचं नुकसान झालं आहे. या शिवाय नव्याने उभारण्यात येणाऱ्या जिल्हा मुख्यालया समोरील रस्त्यावर तीन फूट पाणी साचले आहे. बहाडोली गावातील किणी पाड्यात जाणाऱ्या रस्त्याला दगडाची पिचिंग न केल्याने नव्याने तयार केलेल्या रस्त्याच्या भरावयाची माती शेतकऱ्यांच्या भाताची रोपणी केलेल्या ठिकाणी वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे मनोर मार्गावरील सूर्या नदीला पूर आल्याने या पुरात अनेक वाहने अडकून पडली आहेत. या मार्गावर मनोर गावाच्या पुढे हात नदीला पूर आल्याने मुंबईकडून आलेली वाहने रात्रीपासून अडकून पडली आहेत. त्यामध्ये वृत्तपत्राची गाडी देखील अडकली असल्याने आजचे वृत्तपत्रे पालघरला पोहोचले नाहीत. तर, बोईसर शहरातील अवधनगर, धोडीपूजा, सिडको कॉलनी, रुपरजत नगर, भीमनगर, टॅप्स टाईप १, २, ३, व ४ या कॉलनी व अन्य ठिकाणी तळ मजल्यापर्यंत पाणी भरले होते. त्यामुळे येथील रहिवाशांचे प्रचंड हाल झाले.

बोईसरमध्ये घराघरात पाणी

बोईसरमधील तारापूर अणू ऊर्जा वसाहती समोर असलेल्या सिडको जवळील एका कॉलनीत पाणी शिरल्याने घराघरात पाणी शिरले आहे. येथे राहणारे ज्येष्ठ पत्रकार शाम आटे यांच्या घरात तर पुराचे ४ फूट पाणी साचले असून घरातील सर्व साहित्य वाहून गेले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here