मुंबई: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे रविवारी मध्यरात्रीपासून ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांना आज सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेत या सर्वांची आझाद मैदानात पाठवणी केली. दरम्यान, काही आंदोलक अजूनही ‘गेट वे’ येथेच असून ही जागा रिकामी करावी, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे.

गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नसल्याने पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला हे आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून थांबवल्याच्या बातम्या येत होत्या मात्र, नंतर पोलिसांकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले.

गेट वे ऑफ इंडिया येथील आंदोलनामुळे परिसरातील सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या वाढली होती. सामान्य मुंबईकर आणि देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे आंदोलकांनी ही जागा रिकामी करावी, असे आवाहन आम्ही वारंवार केले. त्यानंतरही आंदोलक ठाण मांडून राहिल्याने अखेर हस्तक्षेप करत त्यांची रवानगी आझाद मैदानात करावी लागली आहे, असे उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांनी सांगितले.

पोलीस व आंदोलकांमध्ये बाचाबाची
गेट वे ऑफ इंडिया येथील आंदोलन अधिक उग्र होत असतानाच पोलिसांनी आज सकाळी त्यात हस्तक्षेप केला. पोलिसांनी आंदोलकांना जागा रिकामी करण्यास सांगितले. मात्र काही आंदोलकांनी त्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला. आंदोलक व पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत पोलीस व्हॅनमधून त्यांची आझाद मैदानात रवानगी केली. दरम्यान, गेट वे ऑफ इंडिया तसेच आझाद मैदान येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मुंबईत ठिकठिकाणी निदर्शने

जेएनयू हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईत विविध ठिकाणी निदर्शने होत आहेत. सोमवारी हुतात्मा चौक ते गेटवे पर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यात मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटीही सहभागी झाले होते. वांद्रे येथील कार्टर रोडवरही निदर्शने करण्यात आली. आयआयटी मुंबई, टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स यासह अन्य शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनीही निदर्शने करत आपला निषेध नोंदवला. अलीकडेच जेएनयूतील विद्यार्थी संघटनेतर्फे फी वाढीसह सीएए, एनआरसी तसेच कॅब रद्द करण्याबाबत आंदोलने करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे. या दडपशाहीमुळे विद्यार्थ्यांचा आवाजच धोक्यात आणला जात आहे, असा आरोपही निदर्शक करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here