पुणे : पुणे शहरातील दोन दिवसांतील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार शुक्रवारी अचानक ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. पवार कुठे गेले आहेत, याची माहिती शुक्रवारी रात्रीपर्यंत त्यांच्या निकटवर्तीयांसह पोलिसांनाही नव्हती. ते यापूर्वी २०१९च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी असेच अज्ञातवासात गेल्याने त्यांच्या शुक्रवारच्या कृतीची चर्चा जोरदार रंगली होती.

पवार यांचे दोन दिवसांचे कार्यक्रम जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार ते बारामती होस्टेल येथे सकाळी नऊ वाजताच दाखल झाले होते. त्यांनी दुपारपर्यंत कात्रज दूध संघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवादही साधला.

आता मुंबईतील रस्ते अपघातांचा धोका टळणार; अपघातप्रवण चौक सुरक्षित करण्यासाठी बीएमसीचा मास्टरप्लॅन
जेवण झाल्यानंतर ते केशवनगर येथील त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी रवानाही झाले. त्यांच्या वाहनांचा ताफा नियोजित कार्यक्रमाच्या अलीकडे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर पोहोचला होता. त्यांच्या कारमध्ये ते, त्यांचे स्वीय सहायक आणि चालक असे तिघेच होते. त्यांची कार थांबली, त्या ठिकाणी त्यांनी नारळपाणीही घेतले. फोनवर बोलत असताना त्यांनी अचानक आपले कार्यक्रम रद्द केले आणि ते पोलिस बंदोबस्त सोडून आपल्या खासगी दौऱ्यावर निघून गेले. नियोजित कार्यक्रमांना शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे; तसेच इतर स्थानिक नेत्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पवार यांनी आपला दौरा रद्द केल्याने ते कुठे गेले, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात अशीच घटना घडली; तेव्हा त्यांनीच खुलासा करून परदेशात असल्याची माहिती दिली होती. याशिवाय २०१९च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी अशाच प्रकारे गायब होऊन, त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामाच थेट विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला होता. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दौरा अर्धवट सोडून ते अज्ञातस्थळी गेल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.

कार्यकर्त्यांना कुणकुण

राष्ट्रवादीच्या मुस्लिम सेलच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. या कार्यकर्त्यांनी बारामती होस्टेलला येऊन इफ्तार पार्टीचे पवार यांना निमंत्रण दिले. त्या वेळी पवार यांनी, आपण पुण्यात असलो तर या पार्टीला नक्की येऊ, असे सांगितले. कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्यावरही त्यांनी तेच उत्तर दिले. नियोजित कार्यक्रम असतानाही पवार असे उत्तर देत असल्याने जवळच्या कार्यकर्त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांत पवार ‘गायब’ झाल्याने ती शंकाही खरी ठरली.

‘देवगिरी’वर असल्याचा निकटवर्तीयांचा दावा

अजित पवार त्यांच्या मुंबईतील अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’ येथे असल्याचा दावा रात्री उशिरा त्यांच्या निकटवर्तीयांनी केला. मात्र, ‘देवगिरी’ बंगल्यावर लँडलाइनवर फोन केल्यावर ‘पवार येथे नाहीत’, असेच सांगण्यात येत होते. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांचे लोकेशन पुणे पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस; तसेच मुंबई पोलिसांना विचारल्यावरही ते त्याला थेट दुजोरा देऊ शकले नाहीत.

डीएफसी रेल्वे पूलाच्या गर्डर उभारणीसाठी आज मध्यरात्री ब्लॉक; ‘या’ लोकल फेऱ्या रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here