dharashiv news, अवकाळीचा फटका! शेतकऱ्यांचं लाखमोलाचं पीक मातीमोल; द्राक्ष, मिरचीसह अनेक पिकं उद्ध्वस्त – unseasonal rain in maharashtra the farmers of dharashiv district have suffered heavy losses in grape and chilli crops
धाराशिव : जिल्ह्यात गेल्या ४ वर्षांपासून वरुणराजाची अवकृपा होत आहे. कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट तर कधी अतिवृष्टी यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकांना जपायचे अन् वरुणराजाच्या अवकृपेमुळे त्याच पिकांना माती मोल होताना पाहायचं, अशी दुर्दैवी वेळ धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर येत आहे. यंदाही अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून काल सायंकाळी झालेल्या गारपिटीत धाराशिव तालुक्यातील महाळंगी येथील द्राक्षे बागेचे मोठे नुकसान झाले आहे. महाळंगी शिवारातील तब्बल ४० एकर द्राक्ष बागेचे नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला गेला आहे. काल झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा अडचणीत आला आहे. लाखो रुपये द्राक्ष बागेवर खर्च करूनही गारपिटीत तीच बाग मातीमोल होत आहे. काल झालेल्या गारपिटीत द्राक्ष बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी खड्डा खोदून काढतात पाणी, पाणी टंचाईमुळे या गावातील मुलांची लग्नं रखडली
काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने व्यापारी देखील माल घेण्यासाठी फिरकत नव्हते. त्यातून अवकाळीच्या तडाख्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून व्यापारी कवडी मोल भावात द्राक्षे मागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
कळंब तालुक्यातील हिंगणगाव येथील राजेंद्र लिंबराज अभंग या शेतकऱ्यांने सहा ते साडेसहा लाख रुपये खर्च करुन शिमला मिरचीची तीन एकर शेतजमिनीवर लागवड केली होती. काल झालेल्या गारपिटीत शिमला मिरचीचे संपूर्ण नुकसान झाले आहे. पुढील ४ दिवसांत या शिमला मिरचीच्या तोडणीला सुरुवात होणार होती. त्या अगोदरच होत्याचे नव्हते झाले आहे.