पुणे : शहर व परिसरात आज सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे झाडे व फांद्या तसेच मोठमोठे होर्डिंग्ज वीज यंत्रणेवर कोसळल्याने काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्ती कामे करून बंद पडलेल्या उपकेंद्रांचा, वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे बहुतांश भागात अर्धा ते पाऊण तासांत वीजपुरवठा सुरू झाला. तर काही ठिकाणी झाडे व फांद्या हटविण्यात येत असल्याने पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा सुरू करण्यात आला.वादळी पावसामुळे सिंहगड रोड, हिंगणे, नऱ्हे, धायरी, वडगाव, दत्तवाडी, जनता वसाहत, गणेशमळा या परिसरातील काही भागात वीजयंत्रणेला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र टप्प्याटप्प्याने रात्री आठ वाजेपर्यंत अर्धा ते पाऊण तासांच्या अवधीत सर्व भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र माणिकबाग परिसरातील सोसायट्यांच्या वीजयंत्रणेवर मोठी झाडे कोसळल्याने तेथील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. तसेच पर्वती पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा वादळी पावसामुळे बंद पडला होता. तो देखील पावणेदोन तासांमध्ये सुरळीत करण्यात आला.

२७ लाख नागरिक बूस्टरच्या प्रतीक्षेत; कोव्हिड रुग्णसंख्येत वाढ होताच लशींच्याही मागणीत वाढ
महावितरणच्या अलंकार उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिनीवर झाड कोसळल्याने उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे कौन्सिल हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व परिसरातील वीजपुरवठा बंद पडला. मात्र अवघ्या ४० मिनिटांमध्ये पर्यायी वीजवाहिनीद्वारे अलंकार उपकेंद्राचा व या सर्व परिसरातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला. यासोबतच कात्रज, कोंढवा, खडी मशीन चौक, पिसोळी, लक्ष्मीरोडचा काही भाग, रविवारपेठ, बुधवारपेठ या भागातील विस्कळीत झालेला वीजपुरवठा अर्धा ते पाऊण तासांमध्ये सुरळीत करण्यात आला.

सर्वत्र याच शेतकऱ्याची चर्चा, या कडधान्याचे पीक घेऊन झाला मालामाल, अमेरिकेत श्रीमंतांचे अन्न अशी ओळख
वादळामुळे वीजयंत्रणेवर पडलेले झाडे व फांद्या हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच वीजयंत्रणेच्या दुरुस्तीला वेग देण्यात आला आहे. या दुरुस्ती कामानंतर पर्यायी स्वरुपात सुरू असलेला वीजपुरवठा मूळ यंत्रणेवरून पूर्ववत करण्यात येईल. तसेच काही सोसायट्यांच्या रोहित्रांवर व लघुदाब वाहिन्यांवर झाडे व फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित आहे. या सोसायट्यांसह वीजपुरवठा खंडित असल्याच्या वैयक्तिक तक्रारींच्या निवारणाची कामे सुरू करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here