रिंकू सिंह आयपीएलमध्ये २०१७ साली पंजाबच्या ताफ्यात होता. त्याच्यासाठी पंजाबनं १० लाख मोजले होते. मात्र संपूर्ण हंगामात त्याला एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही. २०१८ मध्ये रिंकूला केकेआरनं ८० लाख रुपये देऊन आपल्याकडे घेतलं. तेव्हापासून तो केकेआरकडून खेळत आहे. २०१९, २०२० आणि २०२१ मध्ये केकेआरनं त्याला ८०-८० लाख रुपये दिले. २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये केकेआरनं त्याला ५५ लाखांमध्ये खरेदी केलं. याचा अर्थ त्याला आधीच्या तुलनेत कमी पैसे मिळाले. रिंकू सिंह महिन्याकाठी पाच ते सहा लाख रुपये कमावतो. त्यात आयपीएलचा वाटा मोठा आहे.
रिंकूची आयपीएलमधील कामगिरी पाहता लवकरच तो अनेक जाहिरातींमध्ये दिसू शकतो. त्यामुळे त्याच्या कमाईत वाढ होईल. कारण आयपीएल खेळणारे अनेक खेळाडू जाहिरातींमधून दणकून कमाई करतात. त्यामुळे येत्या काही दिवसांत रिंकू जाहिरातींमध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे. रिंकूनं क्रिकेट खेळण्यासाठी मोठा संघर्ष केला. गरिबीच्या दिवसांतही त्यानं क्रिकेट सोडलं नाही. त्यानं अविरत कष्ट घेतले. त्याच कष्टाचं फळ आता त्याला मिळत आहे. रिंकूचं यश अनेक खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.