मिळालेल्या माहितीनुसार, बागलाण तालुक्यात असलेल्या कऱ्हे येथील ललिता म्हाळू गांगुर्डे (वय २२) ही तिच्या आईकडे आली होती. ललिता आई गीता राजेंद्र पगारे (रा. देवळाने) हिच्या सोबत शेतमजुरी करून घराकडे येत असताना पती म्हाळू गोरख गांगुर्डे (वय २३, रा.शनी मंदिर सटाणा ह.मु.कऱ्हे) याने तिला रस्त्यात अडवून माझ्यासोबत बाहेरगावी कामास का येत नाही? अशी विचारणा केली आणि सोबत येण्याचा आग्रह धरला. परंतु ललिताने बाहेरगावी कामाला येण्यास नकार दिल्याने या गोष्टीचा राग येऊन म्हाळू गांगुर्डे याने हातात असलेल्या कोयत्याने पत्नी ललिताच्या डोक्यावर, हातावर आणि पाठीवर सपासप वार केले. यात पत्नी गंभीर जखमी झाली
हल्ला केल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने या घटनेत पत्नी ललिता हिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पती म्हाळू हा तिथून फरार झाला. या घटनेची माहिती जायखेडा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मयताचा मृतदेह नामपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक पाठवले. पोलिसांना आरोपी म्हाळू एका डाळींबाच्या शेतात लपल्याचे समजले त्यानंतर सापळा रचून शेतातून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
घरात पती-पत्नीमध्ये अनेक वाद होत असतात. परंतु या घटनेत पती-पत्नीत बाहेरगावी कामाला जाण्यावरून वाद झाला. पत्नी बाहेरगावी कामासाठी येण्यास तयार नसल्याने याचा राग आल्याने पतीने टोकाचे पाऊल उचलत थेट आपल्या पत्नीचीच हत्या केली. हातात ऊस तोडायचा असलेल्या कोयत्याने पत्नीवर सपासाप वार करत तिला ठार केले. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.