आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज आपली एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताच्या क्रिकेटपटूंचाच दबदबा कायम असल्याचे पाहायला मिळाले आहे. कोणतेही क्रिकेट सुरु नसताना भारताच्या क्रिकेटपटूंनी हे अव्वल स्थान कायम राखले आहे.

करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे जास्त सामने होताना दिसत नाही. इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. पण आज जाहीर करण्यात आलेल्या क्रिकेट क्रमवारीत मात्र भारताच्या क्रिकेटपटूंनी वर्चस्व कायम राखल्याचे पाहायला मिळत आहे.

एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांच्या विभागामध्ये पहिले दोन स्थान भारताच्याच क्रिकेटपटूंच्या नावावर आहे. या यादीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली हा अव्वल स्थानावर विराजमान आहे. कोहलीच्या खात्यामध्ये ८७१ गुण आहेत. या क्रमवारीत दुसरे स्थानही भारताच्याच नावावर आहे. भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने क्रमवारीत दुसरे स्थान कायम राखले आहे. रोहितच्या खात्यामध्ये ८५५ गुण आहेत. या क्रमवारीत तिसरे स्थान हे पाकिस्तानच्या बाबर आझमच्या नावावर आहे. आझमच्या नावावर ८२९ गुण आहेत.

एकदिवसीय क्रमवारीत गोलंदाजांच्या विभागामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. बुमराहच्या नावावर सध्याच्या घडीला ७१९ एवढे गुण आहेत. गोलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा अव्वल स्थानावर विराजमान आहे. भारताच्या अन्य गोलंदाजांना मात्र क्रमवारीत बढती मिळाल्याचे पाहायला मिळालेले नाही. भारतीय संघ आता कधी एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका खेळेल, हे कोणालाही माहिती नाही. भारत जेव्हा एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका खेळेल, तेव्हाच खेळाडूंना या क्रमवारीत बढती मिळवण्याची संधी असेल, असेच दिसत आहे.

आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडने २-१ असा विजय मिळवला होता. या मालिकेत इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने अंतिम एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले होते. त्यामुळे मॉर्गनला एका स्थानाचा फायदा झाला आहे आणि तो २२ व्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो हा १३व्या स्थानावर पोहोचला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here