सोलापूर: अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या मंदिरात कायम गर्दी असते. आषाढी वारी आणि इतर महत्त्वाचे प्रसंग, सण सोडले तरी अगदी दररोज विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. त्यामुळे विठ्ठलाच्या मंदिरात कायमच भाविकांचा राबता असतो. यापैकी अनेक भाविकांच्या विठुरायाच्या चरणाला स्पर्श करण्याची, त्याची पूजाअर्चा करण्याची मनोमन इच्छा असते. मात्र, या पूजाअर्चेसाठीही इतके जण इच्छूक आहेत की, पंढरपूरच्या मंदिरातील दैनंदिन पूजेसाठी पुढील वर्षीपर्यंतचे बुकिंग फुल्ल झाले आहे. या उपक्रमातून पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराची भरघोस कमाई झाली आहे. २०२४ या एका वर्षातील नित्यपूजेसाठी एकूण ३०० बुकिंग झाली आहेत. या माध्यमातून विठ्ठल मंदिराला ७५ लाख रुपये तर रुक्मिणी मंदिराला ३३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

पंढरपुरात दररोज पहाटे चार ते पाच या वेळेत विठ्ठल आणि रूक्मिणी मातेची नित्यपूजा करण्यात येते. यामध्ये विठ्ठलाच्या नित्येपूजेसाठी २५ हजार तर रुक्मिणीच्या नित्येपूजेसाठी ११ हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते. हे शुल्क भरल्यानंतर ठरलेल्या दिवशी संबंधित भाविक आणि त्याच्यासोबतच्या दहाबारा लोकांना नित्यपूजेसाठी मंदिरात प्रवेश देण्यात येतो. विठुरायावर असलेल्या श्रद्धेपोटी ही नित्यपूजा करायला मिळावी, अशी प्रत्येक भाविकाची इच्छा असते. करोनाच्या काळात विठ्ठल मंदिरातील नित्यपूजा बंद करण्यात आली होती. त्यामुळे नित्यपूजेसाठी बुकिंग असलेल्या भाविकांची संधी हुकली होती. मात्र, जानेवारी महिन्यापासून विठ्ठल-रखुमाईच्या नित्यपूजेला सुरुवात झाली असून रोज पाच भाविक कुटुंबांना मंदिरात प्रवेश दिला जातो.

विठुरायाचा खजिना चौपटीने वाढला, देवाच्या चरणी कोटींचं दान; पाहा किती वाढ संपत्ती

करोनाच्या पार्श्वभूमवीर पंढरपूरच्या मंदिरात सतर्कता

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात करोना रुग्णाांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्कचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंढरपूर आणि आजुबाजूच्या परिसरातही करोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विठ्ठल मंदिरातील स्वच्छतेवर भर दिला जात आहे. दिवसातून तीन ते चारवेळा देवाचा गाभारा आणि मंदिरातील दोन्ही सभामंडपांची स्वच्छता केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here