मुंबई :राज्यात अवकाळी पावसाने आधीच थैमान घातलं असताना आता हवामान खात्याकडून पुन्हा एकदा राज्याला पावसाचा इशारा दिला आहे. पुढील ५ दिवसांत कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाट/विजांच्या कडकडाटासह हलका / मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १२ ते १४ या कालावधीत मध्य महाराष्ट्रात गारपिटीची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर १३ एप्रिल रोजी कोकणात आणि १४ एप्रिल रोजी मराठवाड्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रमध्ये मार्च महिन्यामध्ये २८ जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला होता. त्यामुळे आधीच शेतकरी चिंतेत असताना आता पुन्हा एकदा बळीराजा चिंतेत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी नुकसान झालं तर शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी मदत करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

कोणत्या भागांत पावसाची शक्यता?
कोकण आणि विदर्भात वातावरण निवळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी इतर भागांमध्ये मात्र अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात आणि संपूर्ण मराठवाड्यात शनिवार १५ एप्रिलपर्यंत अवकाळी वातावरणाची शक्यता जाणवते. मात्र गारपीट होण्याचा धोका कमी आहे, अशीही माहिती माणिकराव खुळे यांच्याकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, १६ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण निवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका सहन करत असलेल्या बळीराजाला साधारण आठवडाभरानंतर पूर्णत: दिलासा मिळू शकतो.