हिंगोली :एका खुनाच्या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा उलगडा हिंगोली पोलिसांनी केला आहे. आणि या प्रकरणात चक्क मुलगाच आरोपी निघाल्याने पोलीसही चक्रावले आहेत. कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे विष पाजून जीवे मारले म्हणून खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात फिर्यादी असलेल्या मुलास पोलिसांनी दीर्घ चौकशीनंतर अटक करून मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले. त्याला १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय, अशी माहिती समोर आली आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली. मसलगा कासरपेठ तांडा भोकर येथील आप्पाराव रामा राठोड ( वय ५८ वर्ष ) यांचा रामेश्वर तांडाला जाणाऱ्या रस्त्यावर २८ डिसेंबरला मृतदेह आढळून आला होता. सदर प्रकरणी त्यांचा मुलगा विठ्ठल रामा राठोड याच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यातमध्ये तिघा विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. मुलगा विठ्ठल याला सरकारी नोकरी लावून देण्यासाठी दिलेले ९ लाख रुपये मागण्यासाठी रामेश्वर तांडा येथे आप्पाराव गेले. यावेळी विष पाजून त्यांना जीवे मारले म्हणून खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

अत्यंत गुंतागुंतीच्या या खून प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख जी. श्रीधर, अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड व पथकाकडून सुरू होता. सायबर सेलकडून मोठी मदत घेण्यात आली होती. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले.

घरातच सुरु होता वेश्याव्यवसाय, अल्पवयीन मुलीकडे यायचे गिऱ्हाईक, हिंगोलीतील माजी पोलीस कर्मचारी गोत्यात
आपल्या सासरच्या मंडळीकडूनच दगा फटका झाला आणि त्यांनीच वडिलांचा खून केला, अशी तक्रार मृताच्या मुलाने दिली होती. यावरून सासू-सासरा आणि मेहुण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या खून खटल्यातील तपासाला आता नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. पित्याच्या खून प्रकरणी तक्रारदार मुलालाच बाळापूर पोलिसांनी अटक केली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा ते एकघरी या परिसरात दिनांक २८ डिसेंबर २०२२ला आप्पाराव रामा राठोड, (वय ५३ वर्ष, राहणार कासारपेठ तांडा, तालुका भोकर जि. नांदेड ) यांचा मृतदेह आढळून आला होता. बाळापूरचे ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड व इतरांनी मृताची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. त्यावेळी सदर मृत व्यक्ती हे भोकर तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले. रामेश्वर तांडा येथे येऊन या व्यक्तीने आत्महत्या कशी काय केली याचा पोलीस शोध घेत होते. त्यावेळी त्यांचा मुलगा विठ्ठल आप्पाराव राठोड ( खासगी नोकरी, हल्ली मुक्काम कॅप्टन चौक, उदगीर ) याने पैशाच्या वादातून आपल्या सासरच्या मंडळींनी वडिलांचा खून करून मृतदेह शिवारात फेकला, असा आरोप करत तक्रार दिली होती.

हिंगोलीतल्या पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा अंनिसकडून पर्दाफाश, थेट डेमो दाखवून उघडं पाडलं

सरकारी नोकरी लावतो म्हणून माझ्या वडिलांकडून ९ लाख रुपये घेतले होते. नोकरी लावली नाही आणि पैसेही परत दिले नाहीत. या वादातूनच वडिलांचा खून झाल्याचा आरोप मुलाने केला. त्यावरून सासू, सासरा आणि मेव्हणा यांची नावे सांगून त्यांना आरोपी केले. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी खूप तपास केला. अनेकांचे जबाब नोंदवले. या खुनाचे रहस्य उलगडणाचा प्रयत्न केला. दरम्यान, आता या प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. फिर्यादी मुलालाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वडिलांच्या खून प्रकरणी चक्क मुलगाच आरोपी निघाला. पैशाच्या वादातून हा खून झाल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी विठ्ठल आप्पाराव राठोड याला अटक केली. न्यायालयाने त्याला १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांनी दिली आहे. एकंदरीत घडलेल्या या सर्व प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here