सोलापूर :पेटीत ठेवलेले गंठण चोरल्याचे सासूला माहीत झाल्याच्या कारणावरून सासूचा गळा आवळून आणि डोक्यात गंभीर घाव करून सुनेने खून केला. या प्रकरणी बार्शी पोलिसांनी सुनेला बेड्या ठोकल्या आहेत. खाली पडून सासू गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाल्याचा बनाव सुनेने रचला होता. आता बार्शी शहर पोलीस ठाण्यात सुनेवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.बार्शी- सोलापूर रोड येथील बगले चाळ येथे ८ एप्रिलला संध्याकाळी ५.३० ते ६ च्या दरम्यान ही घटना घडली होती. निर्मला महादेव धनवे (वय ५५ रा. बगले चाळ, सोलापूर रोड, बार्शी) असे मृत महिलेचे नाव आहे. कोमल अनिल धनवे (वय २१ रा. बगले चाळ, बार्शी) असे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या संशयित सुनेचे नाव आहे. फौजदार गजानन कर्जेवाड यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. उत्तरीय तपासणीमध्ये गळा आवळून आणि डोक्याला गंभीर मार करून मृत्यू झाल्याची स्पष्ट झाले. आणि हा खून झाल्याची माहिती समोर आली.

सुनेने पोलिसांना दिली खोटी माहिती

सून कोमल धनवे हिने आधी पोलिसांना खोटी माहिती दिली होती. ८ एप्रिलला रात्री ७.४५ सुमारास येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये एक महिला मृत अवस्थेत दाखल झाल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यास प्राप्त झाली होती. त्यानुसार फौजदार गजानन कर्जेवाड व पोलिसांनी तेथे जाऊन मृत महिलेची पाहणी केली. यावेळी मृत महिलेच्या डोक्यात मध्यभागी व कपाळावर उजव्या बाजूस जखम झालेली तसेच मानेवर खरचटलेले व्रण दिसले. पंचनामा करून त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. त्यानंतर पोलिसांनी मृत महिलेच्या घरी जाऊन पंचनामा केला. यावेळी तिथे मृत महिलेचा मुलगा अनिल व त्याची पत्नी कोमल हे उपस्थित होते. घरातील खोलीत मध्यभागी फरशीवर व दाराजवळ रक्त सांडलेले दिसत होते. रक्तामध्ये लोखंडी सांडशी पडलेली होती. याच सांडशीने मृत निर्मला हिने स्वतःच्या डोक्यात मारून घेतल्याचे कोमल हिने पोलिसांना सांगितले.

दिवसभर हमाली, रात्री ‘भलतीच कामगिरी’; मार्केट यार्डात धुमाकूळ घालणाऱ्या दोघांना बेड्या
दोन महिन्यांपूर्वी नांदायला आली होती

बार्शी पोलिसांनी अनिल धनवे याची चौकशी केली. आई निर्मला आणि पत्नी कोमल यांच्यात घरगुती कारणावरून नेहमी वाद होत होते. याच कारणाने सहा महिन्यापूर्वी पत्नीला माहेरी सोडले. नंतर तिने माफी मागितल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी तिला घेऊन आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून सून कोमल आणि सासू निर्मला यांच्यातील वाद वाढले होते. या ना त्या कारणाने सासू-सुनेत कडाक्याचे भांडण होत होते, असे त्याने सांगितले.

विठुरायाच्या वर्षभराच्या नित्यपूजेचं बुकिंग फुल, पहाटे होणाऱ्या एकमेव पूजेसाठी ३०० जणांचे बुकिंग
लाकडी पेटीतून ७ हजार रुपये रोख रक्कम आणि गंठण चोरीला

आईच्या खोलीत एक लाकडी पेटी होती. त्या पेटीत आईने मिनी गंठण आणि भाऊ खंडू याने काम करून दिलेले सात हजार रुपये ठेवले होते. एके दिवशी खंडूने पेटी उघडून पाहिले. यावेळी पैसे आणि मिनी गंठण दिसले नाही. यामुळे आई सतत पत्नी कोमल हिच्यावर संशय घेत होती. यावरून अनिलने पत्नीसा विश्वासात घेऊन विचारले. एका बाइकडून व्याजाने सोळा हजार रुपये घेऊन आले आहे, असे कोमलने सांगितले. तर पैसे आणि मिनी गंठण कोमल हिनेच चोरून नेले आहे, असा संशय सासू निर्मला यांना होता. यामुळे दोघींचे आठ दिवसांपासून भांडण सुरू होते.

६ महिन्यांपासून कुटुंब घरीच गेले नाही; शेत जमिनीसाठी शेतकऱ्याचा पोरा-बाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

आत्या फरशीवर पडली आहे, कोमलचा पतीला फोन

८ एप्रिलला संध्याकाळी ६.३० च्या सुमारास कामावर असताना पत्नी कोमलने अनिल धनवे याना फोन केला. आत्या खाली फरशीवर पडली आहे आणि त्यांच्या डोक्यातून रक्त येत आहे. तुम्ही लवकर या, असे तिने सांगितले. त्यावेळी आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे धनवे याना दिसले. उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, डोक्यात जखम झाल्याने तसेच गळा आवळल्याने निर्मला यांचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यावरून पैसे आणि मिनी गंठण चोरल्याचे सासूला माहिती झाल्याच्या कारणावरून घरात कोणी नसताना कोमलनेच निर्मला यांचा गळा आवळून आणि डोक्यावर वार करून खून केल्याचे निष्पन झाले. पोलिसांनी कोमलवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस ज्ञानेश्वर उदार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here