कुमारस्वामी यांनी कोलारमधील एका सभेत हे वक्तव्य केलं होतं. सभेत बोलताना ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या मुलांसोबत लग्न करायला मुली तयार नाहीत, असं निवेदन मिळालं आहे. शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना २ लाख रुपये दिले जावेत. सरकारनं हा निर्णय घेतल्यास शेतकरी कुटुंबातील तरुणांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा मोठा निर्णय असेल, असं ते म्हणाले.
कर्नाटकची विधानसभा निवडणूक सध्या तिरंगी होणार आहे. काँग्रेस आणि भाजपसोबत जेडीएसनं देखील रणशिंग फुंकलं आहे. काँग्रेसनं निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली होती. आतापर्यंत काँग्रेसनं दोन टप्प्यात उमेदवारांची घोषणा केली आहे. जेडीएसनं पहिल्या टप्प्यात ९३ उमेदवारांची घोषणा केली. तर, भाजपनं काल १८९ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
मतदानपूर्व चाचण्यांमध्ये काँग्रेस आघाडीवर राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता सध्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करणं सुरु आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे.
मुख्यमंत्री होण्यासाठी फिल्डिंग, समर्थक नेत्यांना तिकीट आणि स्वतः सर्वात सुरक्षित मतदारसंघातून मैदानात
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. १० मे रोजी संपूर्ण २२४ मतदारसंघात मतदान पार पडेल. १३ मे रोजी निकाल जाहीर होतील. कर्नाटकच्या विद्यमान विधानसभेचा कालावधी २४ मे रोजी संपणार आहे.
दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, काँग्रेस आणि जेडीएसनं एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी हे मुख्यमंत्री बनले होते. मात्र, दोन्ही पक्षांचे काही आमदार फुटल्यानं त्यांचं सरकार गेलं आणि तिथं भाजपचं सरकार आलं. सुरुवातीला येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले नंतर त्यांना हटवून बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं.