दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत आझाद मैदानात सुरू असलेलं आंदोलन विद्यार्थ्यांनी मागे घेतलं आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
‘गेटवेवर आम्ही कुणालाही त्रास न देता आंदोलन करत असतानाही पोलिसांनी आम्हाला जबरदस्तीनं आझाद मैदानात आणलं. हजारो विद्यार्थ्यांनी हे आंदोलन यशस्वी करून दाखलं आहे. गेट वेवरील आंदोलन आम्ही मागे घेत आहोत, पण आमचा लढा यापुढेही असाच सुरू राहील’, असं आंदोलक विद्यार्थी कपिल अग्रवाल याने सांगितलं.
मुंबईतील विद्यार्थ्यांचं गेल्या दोन दिवसांपासून ‘गेट वे ऑफ इंडिया’वर जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू होतं. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांनीही उपस्थिती लावली होती. ‘गेट वे’वर आंदोलकांची गर्दी होत असल्याने मुंबई पोलिसांनी आंदोलनकांना आझाद मैदानात जाण्याची विनंती केली होती. विद्यार्थ्यांनी नकार दिल्याने आज सकाळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्यांची आझाद मैदानात पाठवणी केली.
आझाद मैदानात आल्यानंतर काही वेळातच आंदोलक विद्यार्थ्यांनी सर्वानुमते आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढा सुरूच राहणार असल्याची भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times