नाशिक :चांदवड तालुक्यातील राहुड घाटात एका अज्ञात इसमाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर व्यक्तीच्या मृतदेहाजवळ एक विषारी औषधाची बाटली देखील सापडली असून घातपाताचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त केला जात आहे. याबाबतची माहिती चांदवड पोलिसांना कळवण्यात आली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राहुड घाटातील डोंगरात लाकूड तोडण्यासाठी गेलेल्या नागरिकांना परिसरात दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन बघितले असता एका इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती चांदवड पोलीसांना कळवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असताना सदर मृतदेह हा नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथील संदीप पुंजाहरी सुडके (४०) यांचा असल्याचे समजले.
दरम्यान, याबाबतची माहिती संदीप सुडके यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. ही माहिती समजताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली. मृत संदीप पुंजाहरी सुडके हे शनिवार (दि.८) दुपारपासून बेपत्ता होते. यासंदर्भात पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. मृतदेहाजवळ एक विषारी औषधाची बाटली आढळून आल्याने मृताच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने ही हत्या की आत्महत्या, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला असून याबाबतचा पुढील तपास चांदवड पोलीस करीत आहेत. संदीप यांच्या मृत्युने सुडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संदीप सुडके यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी आई वडील असा परिवार आहे.