मुंबई : भांडवली गुंतवणूक करण्यासाठी शेअर बाजारांकडे ओढा वाढत चालला आहे. शेअर बाजारात म्युच्युअल फंड आणि थेट गुंतवणुकीच्या माध्यमातून संस्थात्मक तसेच उच्चभ्रू गुंतवणूकदारांच्या तुलनेत सर्वसामान्य वैयक्तिक गुंतवणूकदारांचाच वरचष्मा कायम दिसत आहे. हा किरकोळ (रिटेल) गुंतवणूकदार शेअर बाजारात मुख्यतः म्युच्युअल फंडांतील नियमित मासिक गुंतवणुकीतून (एसआयपी) गुंतवणूक करत आहे. एसआयपीतील ही गुंतवणूक यावर्षी मार्च महिन्यात १४,२७६ कोटी रुपये झाली आहे.एसआयपीद्वारे होणारी गुंतवणूक २०२६पर्यंत २५ हजार कोटी रुपयांवर जाईल, असा विश्वास आनंद राठी वेल्थ मॅनेजमेंटचे डेप्युटी सीईओ फिरोझ अझीझ यांनी मटाकडे व्यक्त केला. एसआयपीचे महत्त्व रिटेल गुंतवणूकदारांसाठी कायम राहणार असल्याला नुवामा वेल्थचे प्रेसिडेंट राहुल जैन यांनीदेखील दुजोरा दिला आहे.देशात गुंतवणूकदारांना प्रशिक्षण देऊन शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वळवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा, अशी सक्ती भांडवल बाजार नियंत्रक सेबीने म्युच्युअल फंड हाऊसना केल्याला यावर्षी १० वर्षे पूर्ण होत आहेत. आर्थिक वर्ष २०१२-१३ पासून खऱ्या अर्थाने सेबीने सर्वसामान्य गुंतवणूकदाराला प्रशिक्षित करण्यावर भर द्यायला सुरुवात केली. रिटेल गुंतवणूकदारांची फसवणूक होऊ नये आणि त्यांना स्वतः भांडवली गुंतवणूक करता यावी, तेवढी सजगता त्यांच्यात निर्माण व्हावी यासाठी सेबीने गुंतवणूकदाराला गुंतवणूक साक्षर करण्याची जबाबदारी फंड हाऊसेसवर टाकली. याला यंदा १० वर्षे झाली आहेत. आता गुंतवणूकदारांना डेट साधनांपासून सावध करणे किंवा त्यातील जोखमीचा अंदाज देणे यावर भर द्यावा लागेल, याकडे अझीझ यांनी लक्ष वेधले. तर वयाने तरुण, नव्याने नोकरी करू लागलेले अशा गुंतवणूकदारांची पहिली पसंती एसआयपीला मिळत आहे, असे राहुल जैन यांनी सांगितले.बाजार पडतो त्यावेळी खरेदी केलेले म्युच्युअल फंडांचे युनिट्स वाढतात. त्यानंतर जेव्हा बाजार वर जातो तेव्हा या संग्रहित युनिट्सची किंमत वाढते हे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे एसआयपीकडे आकर्षण वाढते असल्याचे गुंतवणूक तज्ज्ञ विनायक कुळकर्णी यांनी सांगितले.गुंतवणूकदार प्रशिक्षणावर जवळजवळ पाच हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. हे पैसे वाया न जाता गुंतवणूकदारांमध्ये भांडवल बाजारातील गुंतवणूक साधनांबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे २०२६पर्यंत एसआयपीद्वारे दरमहा होणारी गुंतवणूक २५ हजार कोटी रुपयांपर्यंत गेल्यास आश्चर्य वाटायला नको. ही गुंतवणूक आघाडीच्या ६०० कंपन्यांतून जाईल. – फिरोझ अझीझ, डेप्युटी सीईओ, आनंद राठी वेल्थ मॅनेजमेंटगेल्या चार-पाच वर्षांत एसआयपीद्वारे चांगले उत्पन्न मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. भांडवली गुंतवणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला आहे. गुंतवणूकविषयक राबवलेल्या मोहिमांचा परिणाम झाल्यामुळे एकदा म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करायला सुरुवात केल्यानंतर ती बंद केली जात नाही, असे सर्वसाधारण चित्र आहे.- राहुल जैन, प्रेसिडेंट व प्रमुख, नुवामा वेल्थ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here