यापूर्वी कार्तिक वजीर उर्फ भुऱ्याचे लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व समजावून सांगणारे भाषणही व्हायरल झाले होते. लोकशाहीमध्ये तुम्ही काही पण करू शकता. भांडू शकता, दोस्ती करू शकता, प्रेमाने राहू शकता. पण मला तर मोक्कार धिंगाणा करायला, खोड्या करायला, रानात फिरायला, माकडासारखे झाडावर चढायला खूप आवडते. असं केल्यामुळे माझे बाबा मला मारत नाहीत. कारण ते लोकशाही मानतात, अशा शब्दांत भुऱ्याने लोकशाहीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला होता.
भुऱ्याच्या डोळ्यांची तात्याराव लहानेंकडून तपासणी
लोकशाहीवरील भुऱ्याच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची प्रचंड चर्चा झाली होती. यावेळी भुऱ्याच्या डोळ्यात व्यंग असल्याची माहिती समोर आली होती. ही गोष्ट समजल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती. या बातमीची दखल मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेण्यात आली होती. यानंतर तातडीने हालचाली झाल्या आणि भुऱ्याला वैद्यकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. काही दिवसांपूर्वीच राज्यातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.तात्याराव लहाने यांनी मंगळवारी कार्तिक वजीर उर्फ भूऱ्याच्या डोळ्यांची तपासणी केली होती.