मुंबई

‘निरमा’ पावडरच्या जाहिरातीत बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याने मावळ्याच्या भूमिकेत केलेला नाच आणि कपडे धुताना दाखवल्याचा वाद आता थेट पोलीस ठाण्यात गेला आहे. ‘निरमा’च्या जाहिरातीतून कंपनी आणि अक्षय कुमार यांनी मराठी जनतेच्या भावना दुखावल्याची तक्रार वरळी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच यावर त्वरित योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत मावळे हे स्वराज्याचे शिलेदार होते. त्यांचे कपडे शत्रुच्या रक्ताने स्वराज्याच्या निष्ठेने आणि शिवभक्तीने उजळले यास इतिहास व महाराष्ट्र साक्षीदार आहे. परंतु, या जाहिरातीतून निरमा कंपनीने तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या कंपनीवर योग्य ती कारवाई व्हावी’, असे तक्रारवजा मागणीचे पत्र वरळी पोलिसांना देण्यात आले आहे. यासोबतच निरमा कंपनीच्या सर्व उत्पादनावर बहिष्कार टाकत असून अभिनेते अक्षय कुमार यांचा आम्ही निषेध करतो, असही पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

निरमा पावडरच्या याच जाहिरातीवरुन सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू होती. जाहिरातीत अक्षय कुमार आणि सहकलाकार हे मावळ्यांच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहेत. ते लढाईवरून परतले असून, महाराणी त्यांचे औक्षण करताना दाखवल्या आहेत. युद्धावेळी मळलेल्या कपड्यांवरून त्यांनी भाष्य केलं आहे. त्यानंतर हे मावळे स्वतःचे कपडे धुताना दाखवले गेले आहेत. या जाहिरातीत मावळ्यांचे जे चित्रण केले आहे, त्यावरून ही जाहिरात आणि अक्षय कुमारही वादात सापडला आहे. जाहिरातीवर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर कालपासून त्यांनी #ApologizeAkshay असा ट्रेंड सुरू होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here