मुंबई : पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून बाजारात सकारात्मक वातावरण आहे. गुंतवणूकदारांनी व्याजदरांशी संबंधित बँका, एनबीएफसी, वित्त संस्था, वाहन उत्पादक कंपन्या आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी सुरु ठेवली आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात सेन्सेक्स २८५ अंकांनी वधारला आहे. निफ्टी ७९ अंकांनी व्ह्डरौन १११८६ अंकांवर पोहोचला आहे.

दोन सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने जोरदार आघाडी घेतली होती. मंगळवारी सेन्सेक्सने ७४८ अंकांची भरपाई केली होती. तर बुधवारी तो दिवसभरात ४०० अंकांनी वधारला होता. या दोन सत्रात सेन्सेक्स ११०० अंकांची कमाई केली. यामुळे गुंतवणूकदारांची मालमत्ता किमान तीन लाख कोटींनी वाढली होती.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था कोलमडल्याने रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर रेपो दरात कपात केली आहे. त्यामुळे या पतधोरणात रेपो दरात कपातीचा निर्णय घेतला जाणार नाही, असे मत काही अर्थतज्ज्ञ व बँकर्सनी व्यक्त केले आहे. विकास, महागाई आणि करोना संकट यातून गव्हर्नर शक्तिकांत दास कसा मार्ग काढतात हे थोड्याच वेळात समोर येणार आहे.

आज व्होडाफोन, एचपीसीएल, अदानी पॉवर, लुपिन, एचसीएल इन्फोसिस्टम, जेके टायर यासारख्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. सध्या बाजारात ओएनजीसी, टेक महिंद्रा, बजाज ऑटो, टाटा स्टील, टीसीएस, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयटीसी, एनटीपीसी, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक आदी शेअर तेजीत आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स, ऍक्सिस बँक, मारुती या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

आशियातील शेअर बाजारात आज तेजीचे वातावरण दिसून आले. चालू आठवड्यात व्हाईट हाऊसकडून अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी पॅकेज जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरातील भांडवली बाजारात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी अमेरिकेन शेअर बाजार तेजीसह बंद झाले तर आज आशियात संमिश्र वातावरण आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here