मुंबई टाइम्स टीम

अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर दिसून येत असतात. काही फोटो त्यांनी स्वत: पोस्ट केलेले असतात, तर काही मालिका-चित्रपट प्रदर्शित होताना निर्मिती संस्थेकडून पोस्ट केले जातात. काही वेळा या फोटोंचा गैरवापर होताना दिसतो. ‘पुढचं पाऊल’, ‘सरस्वती’ यासारख्या मालिका आणि ‘बिग बॉस’सारख्या रिअॅलिटी शोमधून घराघरात पोचलेली अभिनेत्री जुई गडकरीला नुकताच असा अनुभव आला. तिच्या फोटोचा गैरवापर होत असल्याचं दिसून आल्यावर तिनं तातडीनं ठाण्याच्या सायबर सेलकडे आणि पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

फेसबुकवरील ” नावाच्या एका पेजवर जुईचा एक फोटो आणि त्याबरोबर काही आक्षेपार्ह संदेश लिहिला असल्याचं जुईच्या एका फॅननं तिच्या लक्षात आणून दिलं. ते पाहून जुईनं त्या पेज अॅडमिनला मेसेज केला. त्यावर त्यांच्या सिस्टीममधून, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, अशी ऑटोमॅटिक लिंक आली. ‘नीता नायक ऑफीशिअल’ या नावानं सुरू असलेल्या या चॅनलला काही लाख व्ह्यूज आहेत. त्यावेळी तिला अनेक इतर मुलींचेही फोटो त्यावर दिसून आले. जुईनं तातडीनं पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार नोंदवली. पोलिसांनीही तात्काळ सायबर सेलला याची माहिती दिली. अशा गैरवापर करण्याच्या गोष्टी वारंवार घडत असल्याने काहीतरी कडक शिक्षा होणं गरजेचं आहे.

जुईनं तिच्या फेसबुक अकाउंटवरून ही घटना शेअर करत इतर मुलींना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. जुई म्हणते की, ‘असे गैरप्रकार आपण सहन केले की ते वाढत जातात. अशा लोकांवर तातडीनं कारवाई व्हायला हवी. ठाणे पोलिसांकडून याबाबत नेहमी सहकार्य मिळतं. एरवी एखाद्या चांगल्या पोस्टकडे लोक ढुंकूनही बघत नाहीत. पण, त्या पेजवरील पोस्टवर हजारो लाइक्स आणि शेकडो कमेंट्स आल्या होत्या.’

‘आम्हा कलाकारांचे फोटो अनेक ठिकाणी छापून येत असतात. पण, त्याबरोबर असा चुकीचा संदेश देऊन फोटोचा गैरवापर होणं हे अत्यंत चुकीचं आहे. कुणाचेही फोटो त्यांच्या परवानगीशिवाय कुठेही वापरता कामा नये. माझ्यानंतर अनेकांनी ही बाब लक्षात आणून दिल्यावर आता ती पोस्ट फेसबुकवरून काढून टाकण्यात आली आहे.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here