पुणे:जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे एक खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल २५ जण जखमी आहेत. आणखी काही प्रवासी हे दरीमध्ये पडलेल्या बसमध्येच अडकून पडले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. ही खासगी बस पिंपरीहून मुंबईच्या दिशेने येत होती. या बसमध्ये मुंबईतील झांजपथकाचे जवळपास ४५ सदस्य होते. पहाटे साडेचारच्या सुमारास बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळच्या दरीत बस कोसळली. त्यावेळी रस्त्यावर वाहनांची फारशी वर्दळ नव्हती.

मात्र, बस १५० फूट खोल दरीत कोसळताच प्रवाशांना खडबडून जाग आली. इतक्या उंचावरुन बस खाली पडल्यामुळे अनेकांना जबर मार लागला होता. हे जखमी झालेले प्रवाशी किंचाळायला लागले आणि त्यांनी मदतीसाठी आक्रोश सुरु केला. त्यामुळे पहाटे साडेचार वाजता दरीतून किंकाळ्यांचा आणि मदतीच्या आक्रोशाचा आवाज ऐकायला येत होता. हा आवाज या परिसरातील ग्रामस्थांच्या कानावर पडला. त्यामुळे या गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्याला सुरुवात केली.

मुंबईचं झांजपथक पथक साखरझोपेत असताना घात झाला, खिंडीसारख्या भागातून बस पुढे निघाली अन् १५० फूट खोल दरीत कोसळली

या बसमध्ये गोरेगावच्या बाजीप्रभू वादक गटातील (झांजपथक) सदस्य होते. हे सर्वजण पिंपरीत आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात वादनासाठी गेले होते. तेथून मुंबईकडे परतत असताना सर्वजण साखरझोपेत होते. त्याचवेळी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटून रेलिंग तोडून बस थेट दरीत कोसळली. रेलिंग तुटल्यानंतर बस वेगाने घरंगळत खाली गेली आणि जोरात आपटली. गाडी इतक्या जोरात आदळली की या बसचे सीट, छत, मधला भाग पूर्णपणे वेगळे झाले आहेत. यावरुन अपघाताची भीषणता लक्षात येऊ शकते. दरम्यान, या दुर्घटनेनंतर सरकारी पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई देण्याचा घोषणा करण्यात आली आहे. तर सर्व जखमींवर सरकारकडून मोफत उपचार केले जाणार आहेत.

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर बस दरीत कोसळली, बोरघाटात भीषण अपघात, मृतांचा आकडा १३ वर

बस जवळपास १५० फूट खोल दरीत कोसळल्यामुळे त्याठिकाणी थेट जाणे शक्य नाही. दोरखंडांच्या मदतीने ट्रेकर्स, अग्निशमन दलाचे जवान खाली उतरून बसमधील जखमी प्रवाशांना एक-एक करुन वर आणत आहेत. त्यानंतर रुग्णवाहिकेत टाकून या सर्वांना पुढील उपचारासाठी रवाना केले जात आहे. काही जखमींवर खोपोलीच्या नगरपालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here