‘प्रमाणपत्र सादर करा’
मुंबईतील रहिवासी इमारती आणि आस्थापनांमध्ये अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र (नमुना ब) मुंबई महापालिकेच्या (https://portal.mcgm.gov.in) संकेतस्थळावर सादर करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. इमारत किंवा इमारतीच्या भागामधील आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक योजनेमधील प्रस्थापित अग्निशमन यंत्रणा उत्तम स्थितीत असल्याबाबत परवानाप्राप्त अभिकारणाकडून सहामाही प्रमाणपत्र (नमुना ब) वर्षातून दोनदा जानेवारी व जुलै महिन्यांत घेणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रमाणपत्र इमारतीचे मालक आणि भोगवटादार यांनी महापालिका संकेतस्थळावर सादर करावे, असे महापालिकेने म्हटले आहे.
२२व्या मजल्यापर्यंत जाणारी शिडी
उंच इमारतींना आग लागल्यास आग विझवण्यासाठी एक विशेष वाहन मुलुंड अग्निशमन केंद्राच्या ताफ्यात गुरूवारी दाखल झाले आहे. या वाहनावर ६४ मीटर उंचीपर्यंत म्हणजेच २२व्या मजल्यापर्यंत जाऊ शकेल, अशी शिडी आहे. सध्या या केंद्रात १५ ते १६ व्या मजल्यापर्यंत जाईल, अशी एकच शिडी आहे. मुलुंडमध्ये उभ्या राहणाऱ्या उत्तुंग इमारतींमुळे हे नवीन वाहन वरदानच ठरणार आहे.
अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताह
१४ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान मुंबई अग्निशमन दलाकडून ‘अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताह’ राबविण्यात येत आहे. या सप्ताहात अग्निशमन दलाकडून विविध स्पर्धा, प्रात्यक्षिके, पथसंचलनासह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अग्निशमन दलाच्या साहित्य आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शनही आकर्षण ठरणार आहे. १५ एप्रिल रोजी विक्रोळी येथील आर सीटी मॉल येथे अग्निशमन दलाकडून साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. विविध ठिकाणीही प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
सातत्याने आगीच्या घटना
जानेवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आगीच्या मोठ्या, किरकोळ, सौम्य स्वरूपाच्या एकूण ७५०हून अधिक घटना घडल्या आहेत. यापैकी सदोष वायरिंग आणि निष्काळजीपणामुळे धूम्रपान करताना लागलेल्या आगीच्या घटना अधिक आहेत.