अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी इडी चौकशीसंबंधी एक मोठा दावा केला आहे. ‘गेल्यावर्षी म्हणजे २०२२ मध्ये इडीचे अधिकारी आपल्याकडेही चौकशीसाठी आले होते. मात्र, त्यांना काहीच सापडले नाही. त्यावेळी मी मनात म्हटले की, इडीवाल्यांनाच माझी दया येऊन तेच खिशातून पैसे काढून मला खर्चायला देतील,’असे वक्तव्य आमदार लंके यांनी केले आहे.अहमदनगर जिल्ह्यात सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सुरू आहेत. त्यासाठी आयोजित प्रचार सभेत आमदार लंके बोलत होते. त्यावेळी भाषणात त्यांनी हा किस्सा सांगितला. आमदार लंके म्हणाले, ‘भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. २०२२ मध्ये इडीचे अधिकारी माझ्याकडेही चौकशीसाठी आले होते. चौकशीत त्यांना माझ्याकडे काहीही अढळून आले नाही. त्यावेळी अधिकारी वैतागून गेले होते. ते पाहून मला मनात वाटले की, माझी ही अवस्था पाहून इडीचे अधिकारी स्वत:च्या खिशातून पैसे काढून मला देतील व म्हणतील राहू दे खर्चायला लागतील,’ असा किस्सा लंके यांनी सांगितला. याच संदर्भाने ते पुढे म्हणाले, ‘भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. आम्ही अडीच वर्षे सत्तेत होतो. मात्र, असा दुरूपयोग केला नाही. आम्ही सर्वसामान्य नागरिकांना कसा फायदा होईल, याचा विचार करून निर्णय घेत होतो,’ असेही लंके म्हणाले. व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला, नगरच्या बाजारपेठेत कडकडीत बंद, व्यापाऱ्यांचा ठिय्या आपले राजकीय प्रतिस्पर्धी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर लंके यांनी नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, ‘ज्यांना कोणी नडत नाही, त्यांना लंके नडतो. माझ्यामागे इडीची चौकशी लावणे एवढे सोपे नाही. संघर्ष माझ्या पाचवीलाच पुजलेला आहे. तो संघर्ष मी करीत राहणार आहे. माझी कामाची पद्धत सर्वांना ठावूक आहे. त्याच पद्धतीने वाटचाल करीत राहणार आहे,’ असेही नीलेश लंके म्हणाले.