नवी मुंबई :जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात १३ जणांनी आपला जीव गमावला असून तब्बल २५ जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी आणि त्यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील कामोठे एमजीएम रुग्णालयात प्रत्यक्ष भेट घेवून विचारपूस व त्यांचे सांत्वन केले. तसंच जखमींवर योग्य ते उपचार करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी एका जखमी प्रवाशाने आपबिती सांगितली आहे.’मुंबईतून निघाल्यानंतर आमच्या बसचा चालक अत्यंत वेगात बस चालवत होता. बसचा हा वेग पाहून अनेक प्रवासी घाबरले आणि त्यांनी चालकाला अनेकदा बस हळू चालवायला सांगितली. मात्र तरीही त्याने बसचा वेग कायम ठेवला अन् शेवटी हा अपघात झाला,’ अशी माहिती एका जखमी प्रवाशाने दिली आहे. त्यामुळे चालकाच्या एका चुकीमुळे १३ जण आपल्या जीवाला मुकल्याचं स्पष्ट झालं आहे.

करोनाने मृत्यू झाल्याचं सांगत रुग्णालयानेच केले अंत्यसंस्कार, दोन वर्षांनी तो घरी परतला, कुुंटुंबीय चक्रावले

दरम्यान, अपघातग्रस्त आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. जखमींच्या आरोग्याबद्दल विचारपूस करत त्यांना दिलासा दिला. यावेळी उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, पनवेल महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख, एमजीएम रुग्णालयाचे डॉक्टर्स, नर्स आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर

भीषण अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रती सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी जाहीर केली आहे. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

दरम्यान, अपघातानंतर तातडीने मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरुणांशी एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. या संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे शिंदे यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here