आईशी घोष आणि इतर आंदोलकांवर एफआयआर नोंदवल्यानंतर जावेद अख्तर यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. आईशी घोषविरुद्ध एफआयआर का नोंदवला गेला हे समजण्यासारखेच आहे. याचे कारण म्हणजे आईशी राष्ट्रवाद्यांना कसे थांबवू शकते?… या राष्ट्रविरोधी लोकांनी आमच्या गरीब बिचाऱ्या गुंडांना लाठी सुद्धा नीट चालवू दिली नाही….(लाठी चालवताना) ते (आंदोलक) मध्येच यायचे. त्यांना (आंदोलकांना) हे सहन करणे आवडते हे मला माहिती आहे, अशा शब्दांत जावेद अख्तर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
घोष आणि इतरांवर तोडफोड करण्याचा आरोप
विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आईशी घोष आणि इतर आंदोलक विद्यार्थ्यांवर जेएनयू प्रशासनाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. या सर्व विद्यार्थ्यांवर ४ फेब्रुवारीला सर्व्हर रुममध्ये तोडफोड करणे आणि उपस्थित सुरक्षा रक्षकांना मारहाण करण्याचे आरोप आहेत. जेएनयू प्रशासनाने ५ जानेवारीला ही तक्रार केली होती. त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
जबाबदारी घेणाऱ्या संघटनेवरही नजर
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलीसांचा तपास सुरू आहे. दिल्ली पोलिसांची नजर हिंदू रक्षा दलाच्या प्रमुख पिंकी चौधरींवर देखील आहे. पिंकी यांनी जेएनयूत झालेल्या मारहाणीची जबाबदारी स्वीकारली आहे. पिंकी चौधरी यांच्या दावाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जेएनयूत हल्ला करणारे मुखवटाधारी हल्लेखोर नेमके कोण आहेत याचाही तपास पोलीस करत आहेत. यासाठी व्हिडिओ फूटेज तपासले जात असून चेहरा ओळखण्याच्या तंत्राचाही आधार घेतला जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times