लखनऊ: कुख्यात गुंड आणि त्याचा भाऊ अशरफची शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हत्या झाली. प्रयागराजच्या काल्विन रुग्णालयात दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येत होतं. त्यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. माध्यमांचे प्रतिनिधी अतिकला प्रश्न विचारत होते. अतिक उत्तर देत असताना तिघांनी गोळीबार सुरू केला. त्यात अतिक आणि अशरफचा मृत्यू झाला. अवघ्या ४० सेकंदांत सगळं काही घडलं. शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास अतिक अहमद आणि अशरफला घेऊन पोलीस वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पोहोचले. माध्यमांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. अतिकचा मुलगा असद दोनच दिवसांपूर्वी पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. त्याच्या अंत्यविधीला अतिकला उपस्थित राहता आलं नाही. त्यासाठीची परवानगी त्याला देण्यात आली नव्हती. त्याबद्दलचा प्रश्न अतिकला विचारण्यात आला. अतिक उत्तर देत होता. काही शब्द बोलला. त्याचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच त्याच्या डोक्याजवळ पिस्तुल दिसलं. एकानं अगदी जवळून गोळीबार केला. अतिक खाली कोसळला. माध्यमांचे प्रतिनिधी दूर झाले. एकूण तीन जणांनी अतिक आणि अशरफवर अगदी जवळून गोळीबार सुरू केला. पुढच्या काही सेकंदांमध्ये दोघेही खाली पडले. तरीही गोळीबार सुरूच होता. एक हल्लेखोर मागे होता. दुसरा हल्लेखोर अतिक आणि अशरफच्या डाव्या, तर तिसरा हल्लेखोर उजव्या बाजूला होता. हल्लेखोरांनी दोघांनी घेरलं होतं. अतिक आणि अशरफ खाली कोसळल्यावर हल्लेखोर हात वर करत सरेंडर सरेंडर ओरडले. तिघांनी बंदुका खाली टाकल्या. दोघे हात वर करून उभे होते. तिसरा जमिनीवर पडला होता. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आणि जीपमध्ये टाकलं. जवळपास ३५ ते ४० सेकंदांत हा घटनाक्रम घडला. गोळीबार सुरू असताना एकही पोलीस कर्मचारी फ्रेममध्ये नव्हता. हल्लेखोरांनी सरेंडर केल्यानंतरच पोलीस पुढे सरसावले. घटनास्थळी कॅमरा आणि आयकार्ड पडलेले दिसले. कोणत्याच पत्रकारानं ते उचलेले नाहीत. हल्लेखोर पत्रकार बनून घटनास्थळी आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. ते कॅमेरा आणि आयकार्ड घेऊन आले असावेत अशी शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली. घटनास्थळी असलेले अनेक पत्रकार एकमेकांच्या ओळखीचे होते. मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलेले तिघेही जण कोणाच्याच परिचयाचे नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here