नवी मुंबईःनिरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा रविवारी पार पडला. मात्र, चार-पाच तास उन्हात बसल्याने ११ जणांना उष्माघातामुळं जीव गमवावा लागला. या घटनेमुळं या मोठ्या उत्सवाला गालबोट लागले. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी भरउन्हात हजारो जण उपस्थित होते. ४२ अंश सेल्सिअस तापमानात व रखरखत्या उन्हात बसल्यामुळं श्री सदस्यांना उन्हाचा त्रास जाणवू लागला. उष्माघातामुळं अनेक जण बेशुद्ध पडत होते. या घटनेनंतर उष्माघात म्हणजे काय आणि त्याची लक्षणे काय असतात?, याबाबत घेतलेला सविस्तर आढावा

उष्माघात म्हणजे काय?

उष्माघात आणि उष्मापात असे दोन प्रकार आहेत. सतत कडाक्याच्या उन्हात काम केल्यानंतर उष्मापात होतो आणि त्यातून होणारी तीव्र समस्या म्हणजेच उष्माघातशरीराने मर्यादेपेक्षा जास्त निर्माण केली किंवा उष्णता शोषून घेतली तर हायपरथर्मिया म्हणजेच अतिउच्च तापमानाचा आजार होतो. उष्माघात हा त्याचाच एक प्रकार आहे. उष्माघात म्हणजे हीट स्ट्रोक किंवा त्याला सनस्ट्रोक असंही म्हणून शकता. रखरखत्या उन्हात बाहेर पडल्यामुळं किंवा जास्तवेळ उन्हात थांबल्यामुळं शारिरातील उष्णता संतूलन संस्था नाकाम होते.

उष्माघातामुळं मृत्यू कसा होतो?

अतिउष्णतेमुळं शरिरातील प्रथिनांवर दुष्परिणाम होतो व शरिरातील जीवनप्रक्रिया थांबते. शरीरातल्या सर्व अवयवातील पेशींमध्ये हा परिणाम होतो. यात मृत्यूचे कारण बहुधा ‘मेंदूसूज’ म्हणजेच एनसेफलोपथी हे असते. यामध्ये शरीराचे तापमान अकस्मात उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्तीच्या मेंदूच्या उतींना नुकसान पोहोचून व्यक्ती कोमात जाण्याची व दगावण्याची शक्यता असते. जास्त तापमानामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होतात.

महाराष्ट्र भूषणः ११ श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू; ८ मृतांची ओळख पटली; प्रशासनाकडून नावे जाहीर

उष्माघात कोणाला होऊ शकतो

उष्माघात हा प्रामुख्याने अर्भकं, लहान मुलं, वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणाऱ्यांमध्ये आढळतो. तसेच हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक व्याधीसारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींनाही सहज उष्माघात होऊ शकतो.

उष्माघात झाल्यास काय कराल?

उष्माघात झाल्यास शरीरातील जास्त झालेली उष्णता लवकरात लवकर बाहेर काढणे व रक्ताभिसरण खेळते ठेवणे हाच प्रथमोपचार आहे. सर्वप्रथम व्यक्तीला शक्य असल्यास वातानुकूलित जागेत अन्यथा सावलीत वा थंड ठिकाणी हलवावे आणि शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावेत. त्यामुळे शरीरातील उष्ण तापमान कमी होण्यास मदत होते. तसंच, त्या व्यक्तीचे शरीर ओल्या कापडाने पुसून घ्यावे.

महाराष्ट्र भूषण सोहळ्यात नेमकं काय घडलं, इतक्या लोकांचे मृत्यू कसे झाले, तापमान नेमकं किती होतं?

काळ काळजी घ्याल

सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असते तेव्हा शक्यतोवर उन्हात फिरणे, काम करणे किंवा खेळणे टाळा. उन्हात बाहेर पडायचे झाल्यास शक्यतो स्कार्फ किंवा छत्री जवळ ठेवावी. सौम्यरंगांचे आणि ढिले कपडे वापरावे. टाइट जीन्स आणि भडक कपडे वापरणे टाळावे. जवळ पाण्याची बाटली ठेवावी.तापमानवाढीबरोबरच पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. तहान लागण्याची वाट न पाहता दररोज ८ ते १० ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यावे. आहारमध्ये काकडी, संत्री, कलिंगड आणि लिंबू, कांदा यांचा भरपूर वापर करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here