मुंबई :महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेला अवकाळी पाऊस पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. जोपर्यंत दक्षिण भारतातील वारा खंडितता प्रणाली बदलत नाही किंवा नामशेष होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील अवकाळी पावसाची स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे राज्यामध्ये या आठवड्यातही पावसाळी वातावरण कायम असून विविध जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.रविवारी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, पालघर जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी यलो अलर्ट असून ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातही बुधवारसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र राजधानी मुंबईत पुढील पाच दिवस वातावरण कोरडे राहील अशी शक्यता आहे.

राजकीय भूकंप? अमित शहांच्या मुंबई भेटीची Inside Story, राष्ट्रवादीबाबत असा आहे प्लॅन

धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली येथे बुधवारी आणि काही जिल्ह्यांमध्ये त्यानंतर गुरुवारीही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाचे सातत्य कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, बुलडाणा, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ येथे मंगळवारपासून तर वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती आणि अकोला येथे बुधवार आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये त्यानंतरही मेघगर्जनेसह पाऊस कोसळू शकतो. दक्षिण भारतातील वारा खंडितता प्रणाली जोवर कायम राहील तोवर महाराष्ट्रातील अवकाळीची स्थिती निवळण्याची शक्यता नाही, अशी माहिती निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.

सुमारे एका महिन्याहून अधिक काळ उलटला तरी ही प्रणाली टिकून आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी पूर्वमोसमी पाऊस आणि आत्ताचा पाऊस यात साधर्म्यता वाटत असली, तरी वातावरणीय प्रणाली वेगळी असल्याने हा पूर्वमोसमी पाऊस नाही, असंही माणिकराव खुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात एकीकडे पाऊस सक्रिय असला, तरी दुसरीकडे कमाल तापमानाचा पाराही वाढत आहे. हा पारा सरासरीच्या आसपास असला, तरी त्याचे चटके अधिक जाणवू लागले आहेत. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये यामध्ये आणखी तीन अंशांनी वाढ होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here