चंद्रकांत तराळेकर (वय ६९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील एका कारने त्यांना चिरडले. चंद्रकांत तराळेकर हे सांगलीच्या वीटा येथील रहिवासी होते. सांगलीतून ४५ जणांचा एक ग्रुप एसटीने खारघर येथील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाला होता. शनिवारी संध्याकाळी ७ वाजता हे सर्वजण सांगलीहून नवी मुंबईच्या दिशेने निघाले होते. रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्यांची एसटी बस नवी मुंबईजवळ आली होती. ही बस एक्प्रेस वेवरील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनमधील फुडमॉलवर थांबली होती. चंद्रकांत तराळेकर आपल्या मित्रासोबत पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनच्या बाजुला गेले होते. ते लेन क्रॉस करुन पुन्हा आपल्या एसटीच्या दिशेने येत असताना एका XUV कारने त्यांना चिरडले. याप्रकरणी खोपोली पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
खारघर दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
खारघर येथील सेंट्रल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे अनेक श्रीसेवक बेशुद्ध पडले होते. जवळपास ३०० श्रीसेवकांना उष्माघातामुळे भोवळ येणे, बेशुद्ध पडणे असा त्रास जाणवला. यापैकी १२ श्रीसेवकांचा मृत्यू झाला. सध्या जवळपास २६ श्रीसेवकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.