मयुरेश प्रभुणे, पुणे :‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या कार्यक्रमादरम्यान १२ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. तापमान आणि आर्द्रतेचा एकत्रित परिणाम दर्शवणारा ‘उष्मा निर्देशांक’ (हिट इंडेक्स) धोकादायक पातळीत असताना दीर्घकाळ सूर्यप्रकाशात राहिल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कार्यक्रम सुरू असताना मुंबई आणि लगतच्या क्षेत्रात उष्मा निर्देशांक ४० ते ४८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता, असे आकडेवारी सांगते.अशी होते मोजणी

कमाल तापमान आणि सापेक्ष आर्द्रता या दोन घटकांना गृहीत धरून एका सूत्राद्वारे उष्मा निर्देशांक (हिट इंडेक्स) मोजला जातो. वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास हवेच्या प्रत्यक्ष तापमानापेक्षा शरीराला जाणवणारे तापमान जास्त असते. हवेत आर्द्रता जास्त असल्यास शरीरातून घाम बाहेर पडण्याची प्रक्रिया मंदावते. घाम कमी आल्यामुळे शरीराचे तापमान वाढत जाऊन उष्माघाताचा त्रास होतो.

काय सांगते आकडेवारी?

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) मुंबई आणि लगतच्या रायगड जिल्ह्यातील केंद्रांवरील तापमान आणि सापेक्ष आर्द्रतेच्या रविवारच्या नोंदी गृहीत धरल्यास खारगर येथे उष्मा निर्देशांक धोकादायक पातळीमध्ये असल्याचे दिसून येते. रविवारी दुपारी १२.४५ ला सांताक्रूज येथे उष्मा निर्देशांक ४६ अंश सेल्सिअस, कुलाबा येथे ४० अंश सेल्सिअस, तर कर्जतला ४८ अंश सेल्सिअस इतका नोंदला गेला. उष्मा निर्देशांकाची ४१ अंश ते ५४ अंश सेल्सिअस ही पातळी धोकादायक मानली जाते. उष्मा निर्देशांक या पातळीमध्ये असताना दीर्घकाळ सूर्यप्रकाशात राहिल्यास उष्माघाताचा त्रास होतो.

ही माझ्या कुटुंबावर कोसळलेली आपत्ती, १३ श्री सदस्यांच्या निधनाने आप्पासाहेब धर्माधिकारी व्यथित
नियमावली करायला हवी

याबाबत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ आणि सेंटर फॉर सिटीझन सायन्सचे (सीसीएस) उपाध्यक्ष डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले, ‘उन्हाळ्यामध्ये उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी फक्त हवेचे तापमान पाहणे पुरेसे नाही, हे या घटनेतून स्पष्ट होते. जाहीर सभा, कार्यक्रमच नाहीत, तर दुपारच्या वेळी भर उन्हात शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्यांसाठी देखील उष्मा निर्देशांक पाहून मार्गदर्शक सूचना आणि नियमावली तयार करायला हवी. गुजरातमध्ये हिट ऍक्शन प्लॅन अंतर्गत उष्मा निर्देशांक गृहीत धरून उन्हाळ्यात कामाच्या वेळांचे, सभा, कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. महाराष्ट्रातही हिट ऍक्शन प्लॅन लागू करणे; तसेच उष्मा निर्देशांकाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.’

जेवून घ्या रे, महाराष्ट्र भूषण सोहळ्यातून आईचा फोन; लेकरं शोधत राहिली, माऊली परतलीच नाही
उष्मा निर्देशांक पातळी : परिणाम आणि सूचना (आकडे अंश सेल्सिअसमध्ये)

> २७ – ३२ (सर्वसाधारण पातळी) – दीर्घकाळ या स्थितीत राहिल्यास थकवा शक्य

> ३२ – ४१ (चिंताजनक पातळी) – दीर्घकाळ या स्थितीत राहिल्यास उष्माघाताचा सर्वसाधारण त्रास

> ४१ – ५४ (धोकादायक पातळी) – दीर्घकाळ या स्थितीत राहिल्यास उष्माघाताचा तीव्र त्रास, आजाराची पार्श्वभूमी असलेल्यांसाठी जास्त धोकादायक

> ५४ आणि अधिक (अतिधोकादायक पातळी) – उष्माघाताचा तीव्र त्रास, प्रसंगी मृत्यूही संभवतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here