गुरुग्राम: माहेरी आलेल्या महिलेचा सासूरवाडीपर्यंत पाठलाग करणाऱ्या माथेफिरू तरुणाने घरात घुसून पती आणि सासू-सासऱ्यांसमोर तिला चाकूने भोसकले. गुरुग्राममध्ये ही धक्कादायक घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या महिलेला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विवेक कुमार (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. दिल्लीतल्या कोंडली परिसरात तो राहतो. कॉलेजला असल्यापासून तो तिचा पाठलाग करत होता. काही दिवसांपूर्वीच तिचं लग्न झाल्याचं त्याला समजलं. त्यानंतर तो तिचा शोध घेत होता. ती माहेरी आल्याचे समजताच तो तिथे पोहोचला. मात्र, पती आणि सासू तिच्यासोबत होती. त्यामुळे त्याने गुरुग्रामपर्यंत तिचा पाठलाग केला. त्यानंतर घरात घुसून पती आणि सासू-सासऱ्यांसमोर त्याने तिच्यावर चाकूहल्ला केला. हल्ल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. शेजारील घराच्या छपरावरून उडी मारताना त्याचा तोल गेला आणि पकडला गेला. यात त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तरूण दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. काही दिवसांनी महिलेचे गुरुग्राममधील एका तरुणाशी लग्न झाल्याची माहिती त्याला मिळाली. तिच्या घराचा पत्ता त्याला माहिती नव्हता. तिच्याशी संपर्क साधताही येत नव्हता. काही दिवसांनी विवेकला अचानक ती गुरूग्राममध्ये दिसली. तो तिच्या घराचा पत्ता शोधू लागला. पण लॉकडाउनच्या काळात त्याला शोध घेता आला नाही. रक्षाबंधनसाठी ती आपल्या माहेरी नोएडामध्ये आली. सोमवारी तो तिच्या घरी पोहोचला. तिला काही करून भेटायचं होतं. पण तिच्यासोबत पती होता. संध्याकाळी ती आणि पती दोघेही गुरुग्रामला जायला निघाले. तरुणाने त्यांचा पाठलाग केला. सोमवारी रात्री ९.१० च्या सुमारास विवेक त्यांच्या राजीवनगरमधील घरी पोहोचला. तिचा मित्र असल्याची ओळख त्याने करून दिली. ती खोलीतून बाहेर येताच त्याने चाकूने तिच्यावर हल्ला केला. सासऱ्याने तिला वाचवायचा प्रयत्न केला असता, त्याच्यावरही हल्ला चढवला. त्यानंतर पळून जाताना तो शेजारील घराच्या छपरावरून पडल्याने पकडला गेला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जखमी महिला आणि तिच्या सासऱ्याला नजीकच्या रुग्णालयात नेले. तिथे उपचार केल्यानंतर महिलेला पुढील उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं. महिला आणि आरोपी तरूण एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. त्याने तिला अनेकदा प्रपोज केला होता. पण तिने त्यास नकार दिला होता. आरोपी तिच्यावर हल्ला करण्यासाठी पूर्वतयारीने आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here