वृत्तसंस्था, नवी दिल्ली :देशातील सर्वात वेगवान ट्रेन म्हणून नावाजलेल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे चाकही रुळातच रुतल्याचे दिसून येत आहे. ताशी १३० किमी वेगाने धावण्याची परवानगी या ट्रेनला आहे. परंतु, रुळांच्या खराब स्थितीमुळे गेल्या दोन वर्षांपासून ही एक्स्प्रेस सरासरी सुमारे ८३ किमी प्रतितासाच्या वेगाने धावत आहे. माहिती अधिकारांतर्गत ही माहिती समोर आली आहे.गेल्या दोन वर्षांत ही ट्रेन एका मार्गावर सरासरी ९५ किमी प्रतितास वेगाने धावली आहे. या ट्रेनची रचना कमाल वेग १८० किमी प्रतितास अशी असून, व्यावसायिक सेवांसाठी तिला कमाल वेग १३० किमी प्रतितास ठेवण्याची परवानगी आहे.

मध्य प्रदेशचे रहिवासी चंद्रशेखर गौर यांनी माहितीच्या अधिकाराखाली याबाबत माहिती मागवली होती. ‘सन २०२१-२२मध्ये सेमी-हायस्पीड ट्रेनचा सरासरी वेग ८४.४८ किमी प्रतितास होता, तर २०२२-२३मध्ये तो ८१.३८ किमी प्रतितास होता,’ असे त्यांना सांगण्यात आले.

‘रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन’द्वारे (आरडीएसओ) वंदे भारत एक्स्प्रेसचे डिझाइन करण्यात आले आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) ते तयार करण्यात आले आहे.

लोकल, रस्ते वाहतुकीवर मेट्रो रेल्वेचा किती परिणाम? MMRDA करणार अभ्यास
मुंबई सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसचा सरासरी वेग सर्वात कमी म्हणजे, सुमारे ६४ किमी प्रतितास आहे; तर नवी दिल्ली-वाराणसी वंदे भारत एक्स्प्रेस सर्वाधिक सरासरी ९५ किलोमीटर प्रतितास वेगाने धावते. ही देशातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन असून, ती २०१९मध्ये सुरू झाली. त्याचप्रमाणे राणी कमलापती (हबीबगंज) – हजरत निजामुद्दीन वंदे भारत एक्स्प्रेस ९४ किमी प्रतितासाच्या सरासरी वेगासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
रेल्वेच्या अ‍ॅपमधून कोपर स्थानकच गायब, प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण, अडचणींचा प्रवास कायम
वंदे भारत एक्स्प्रेसचा सरासरी वेग राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसपेक्षा चांगला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here