मुंबई :राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी फुटणार का, असाही प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ‘माझं आज सकाळीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि अन्य महत्त्वाच्या नेत्यांसोबत बोलणं झालं आहे. अजित पवार हे कुठेही जाणार नसून त्यांचं नेतृत्व महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच शिखरावर जाईल,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.’राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून नक्कीच सुरू आहे. मात्र आमदार फुटले तरी पक्ष फुटणार नाही. राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांच्या नावाशी बांधलेला आहे. जसं शिवसेनेतून आमदार फुटले, मात्र पक्ष जागेवरच राहिला आहे. माझी पक्की माहिती आहे की ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्या सर्व खोट्या आहेत. भाजप जाणीवपूर्वक अफवा आणि वावड्या उठवत आहे आणि मतभेत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे,’ असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.
सध्या ज्या बातम्या येत आहेत त्यातून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या पोटात गोळा येत असेल. त्यांची अस्वस्थात मी समजू शकतो, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
‘भाजपच्या १० जागाही निवडून येणार नाहीत’
भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन ४५ प्लस आखण्यात आल्याची चर्चा आहे. या चर्चेवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘भाजपच्या ४५ काय १० जागाही निवडून येणार नाहीत. विधानसभेला महाविकास आघाडीच्या कमीत कमी १७५ जागा निवडून येणार आहेत. कितीही आमदार फोडले, खासदार फोडले तरी महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीसोबत राहील,’ असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.