मी आज नेहमीप्रमाणे ऑफिसला बसलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नेहमीप्रमाणे कमिटीच्या मिटिंगला आले होते. त्यांची मंत्रालयात कामं होती. मी इकडे होतो म्हणून ते मला भेटायला आले. या आमदारांची माझ्याकडे काही कामं असतात. मात्र, गैरसमज पसरवणाऱ्या बातम्यांमुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. पण त्यांनी काळजी करु नये. राजकारणात अनेक चढउतार येतात. महत्त्वाच्या प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र, आता कोणतेही गैरसमज पसरवू नका. आता या विषयाचा तुकडा पाडा. हा विषय इथेच संपवा, असे अजित पवार यांनी म्हटले.
मी नागपूरची वज्रमूठ सभा आटोपून येत असताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत विमानातून आलो होतो. यावळी आमच्यात चर्चा झाली होती. तेव्हा मी त्यांना या सगळ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते, असेही अजित पवार यांनी सांगितले. परंतु, मध्यंतरी मी भाजपमध्ये जाणार अशा बातम्या यायला सुरुवात झाली तेव्हा उद्धव ठाकरे हे मी एकटाही लढेन, असे म्हटले. चुकीच्या बातम्यांमुळे हे गैरसमज निर्माण झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका महाविकास आघाडीत राहण्याची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढवणे, हीच आमची भूमिका असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊत यांनाही टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसविषयी सुरु असलेल्या चर्चांविषयी बोलायला आमच्या पक्षाचे प्रवक्ते समर्थ आहेत. उगाच दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी आमचे प्रवक्ते म्हणून बोलू नये. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडावी, आमचे वकीलपत्र त्यांनी घेऊ नये, असा टोला अजित पवार यांनी राऊतांना लगावला.