धुळे :सुक्या चाऱ्याच्या गोण्यांखाली महिंद्रा पिकअप वाहनातून होत असलेल्या विदेशी दारू व बिअर तस्करीचा शिरपूर तालुका राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. मध्यप्रदेशातून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या पिकअप वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंदीत असलेला लाखो रुपयांचा बिअर व विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. दारू तस्करांच्या या अनोख्या शक्कलने सगळेच चकित झाले आहेत.शिरपूर तालुका राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. एस. हांडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बोराडी मालकात्तर रस्त्याने एका चारचाकी वाहनामधून मध्यप्रदेशकडून धुळ्याकडे अवैधरित्या बिअर व दारू वाहतूक केली जात असल्याने बोरडी गावाजवळ आज सकाळच्या सुमारास सापळा लावण्यात आला होता.
यावेळी संशयित वाहन क्र. एम.एच १८ बीजी ५८१९ हे येत असल्याचे दिसले. त्यास थांबविण्याच्या इशारा केला असता सदर वाहनाच्या वाहनचालकाने सदर वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून अंधाराचा फायदाघेत पसार झाला. वाहनाची तपासणी केली असता प्रथम दर्शनी सुक्या चाऱ्याच्या गोण्या यात दिसून आल्या.
सदरच्या गोण्या बाजूला करून वाहनात सखोल तपासणी केली असता माउंट बिअर महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या एकूण १४४० टीन मिळाले व रॉयल ब्ल्यू व्हिस्कीच्या एकूण १९२० बाटल्या हाती लागल्या. चारचाकी वाहनासह एकूण ९ लाख ४१ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. वाहन चालक व मालक यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.