अहमदनगर :आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक आंदोलने करून जनहिताच्या कायद्याच्या निर्मितींसाठी पुढाकार घेतलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता ‘उद्योजक’ बनले आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांच्या रकमेतून हिंद स्वराज ट्रस्टच्या माध्यमातून हजारे यांनी लाकडी घाण्यावरील तेल आणि मसाले निर्मितीचा उद्योग राळेगणसिद्धी येथे सुरू केला आहे. अर्थात नफा कमावण्यासाठी नव्हे; तर गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी त्यांना ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर येथील उत्पादने विकण्यात येत आहेत.राळेगणसिद्धी गावात हिंद स्वराज्य ट्रस्ट या हजारे यांनीच स्थापन केलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून हजारे यांनी हा नवीन प्रकल्प सुरू केला आहे. सध्या तो प्रायोगिक तत्वावर सुरू आहे. हळूहळू त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. हजारे यांना मिळालेल्या विविध पुरस्कारांच्या रकमेतून सुमारे २४ लाख रुपये खर्च करून हा लाकडी घाण्यातून तेल निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सध्या यामध्ये सूर्यफूल, करडई, शेंगदाणे आणि नारळाचे तेल काढले जाते. भविष्यात आणखी ७० प्रकारच्या तेलबियांपासून तेल निर्मिती करण्याचा हजारे यांचा मनोदय आहे. याशिवाय मिरची पावडर, हळद पावडर, जिरे पावडर आणि विविध प्रकारचे मसालेही या प्रकल्पात तयार होणार आहेत. गुढी पाडव्याला याची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. आता गावकऱ्यांसाठी हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.

केजरीवाल दोषी आढळले तर शिक्षा झालीच पाहिजे, माजी सहकाऱ्याबद्दल अण्णा हजारेंच्या भावना
आतापर्यंत या ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामविकासाचे प्रकल्प राबविण्यात आले. याच माध्यमातून विविध आंदोलने झाली. त्यासाठी देश आणि राज्य पातळीवर जनहिताचे विविध कायदे झाले. भ्रष्टाचार विरोधी मोहीमही येथून चालविली जाते. लोकांच्या तक्रारी येथे येतात, त्याचा पाठपुरावा येथून केला जातो. यासाठीचा खर्च ट्रस्ट स्वत: आणि देणग्यांतून भागवत असते. आता आणखी एक पाऊल पुढे टाकून ट्रस्टच्या माध्यमातून गावकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त भावातील तेल व मसाले उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
रत्नागिरीत अवकाळी नसल्याने हापूस सामान्यांच्या अवाक्यात, एक पेटी आंब्याचा दर काय?
खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ सध्या चिंतेची बनली आहे. तेलातील भेसळीमुळे हदयाशी संबंधित आजार तरुण वयातही होऊ लागले आहेत. लोकांना भेसळमुक्त आणि स्वस्त दरात दर्जेदार तेल मिळावे, या उद्देशाने हा प्रकल्प सुरू केला आहे. नफा कमाविण्याचा उद्देश नाही. गरजेनुसार याचा विस्तार केला जाणार आहे.

– अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here