उष्माघातासाठी सज्जता
उष्माघाताच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात बेडसह स्वतंत्र खोली सज्ज ठेवा, असे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात आणि जिल्हा आरोग्य अधिकारी हर्षल नेहते यांनी दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांत प्रत्येकी दोन, तर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी एक बेड राखीव ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी मंगळवारी दिली.
मुंबईत खारघर येथे उष्माघातामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातही दोन महिलांसह तिघांनी उष्माघातामुळे जीव गमावला आहे. उन्हाच्या चटक्यांमुळे अंगाची लाही लाही होत असून, जिल्ह्यातही उन्हाचा तडाखा वाढतो आहे. नाशिकमधील कमाल तापमान ३९.२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा चांगलाच घाम फोडणार अशी भीती व्यक्त होत आहे. उष्माघाताचे रुग्ण उपचारांसाठी सरकारी रुग्णालयांत येऊ शकतात, ही शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागानेही प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत सर्वच ठिकाणी बेड राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात शेतकरी वर्गाला, तसेच मोलमजुरी करणाऱ्यांना उन्हातान्हात काम करावे लागते. त्यामुळे अशा नागरिकांना उष्माघाताचा धोका संभवण्याची शक्यता अधिक असते. उष्माघाताची लक्षणे असणारे रुग्ण उपचारांसाठी आल्यास तातडीने उपचार सुरू करण्यासाठी आइस पॅक, पॅरासिटॅमॉलसारखी औषधे उपलब्ध ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यात ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, प्रत्येक केंद्रात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र खोली आणि त्यामध्ये एक बेड राखीव ठेवण्यात आला आहे. या खोलीत हवा खेळती राहील, याची काळजी घेतल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयांसह उपजिल्हा रुग्णालयांत प्रत्येकी दोन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.
जिल्ह्यात तूर्तास उष्माघाताचा एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु, रुग्ण उपचारांसाठी येण्याची शक्यता गृहीत धरून सरकारी रुग्णालयात प्रत्येकी दोन बेड राखीव ठेवण्याच्या सूचना संबंधित वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
– डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक
उष्माघाताची लक्षणे
– थकवा येणे
– वारंवार तहान लागणे
– अस्वस्थ वाटणे
– डोके दुखणे
– जीभ कोरडी पडणे
– डिहायड्रेशन
– रक्तदाब कमी होणे
– हृदयाची धडधड वाढणे
– त्वचा लाल होणे
– बेशुद्ध पडणे
– चक्कर येणे
– मळमळणे
– श्वास घेण्यास त्रास होणे
– स्नायूंमध्ये वेदना होणे
काय काळजी घ्यावी
– प्रखर उन्हात जाणे टाळावे
– घराबाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी
– जास्तीत जास्त पाणी प्यावे
– लिंबूपाणी प्यावे
– द्रव पदार्थांचे अधिक सेवन करावे
– सुती कपडे वापरावेत
– आवश्यकता भासल्यास छत्री वापरावी
– दुपारी १२ ते सायंकाळी ५ यावेळेत कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे