सांगली: क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणातील पाणीसाठा ८५ टक्क्यांवर गेल्याने पाटबंधारे विभागाने गुरुवारी दुपारपासून पाण्याचा विसर्ग सुरू केला. धरणाच्या दरवाजांमधून तीन हजार क्युसेक, तर वीज निर्मिती गृहातून १४०० असा एकूण ४४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. विसर्ग सुरू झाल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत गतीने वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ( Heavy Rain in Region )

वाचा:

जिल्ह्याच्या पश्चिम भागात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला. विशेषतः वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा ८२ टक्क्यांवर पोहोचला. धरणात २२ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने पाटबंधारे विभागाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. गुरूवारी दुपारी तीन वाजता पाटबंधारे कार्यालयाचे सहायक अभियंता मिलिंद किटवाडकर, शाखा अभियंता टी. एस. धामणकर यांच्या हस्ते पाणी पूजन करून पाण्याचा विसर्ग सुरू केला. धरणाच्या पायथागृहातील वीज निर्मिती सुरू झाली आहे. वीज निर्मिती केंद्रातून १४०० क्युसेक आणि मुख्य वक्राकार दरवाजातून ३००० क्युसेक असा एकूण ४४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.

वाचा:

धरणातून विसर्ग सुरू झाल्याने वारणा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. धरणातील विसर्गामुळे नदी काठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. आपत्कालीन मदतीसाठी एनडीआरएफची दोन पथके जिल्ह्यात तैनात आहेत. यातील एक पथक सांगली शहरात, तर दुसरे पथक आष्टा येथे आहे. दरम्यान, जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत सांगलीत कृष्णा नदीची पातळी २३ फुटांवर होती. धरणातील विसर्ग सुरू नसल्याने कृष्णा काठावर अद्याप पुराचा धोका नाही.

कोल्हापुरातही पूरसंकट

कोल्हापुरातील पंचगंगा नदीने सांयकाळी धोका पातळी ओलांडल्याने आणि राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्याने जिल्ह्यात पुराचा धोका निर्माण झाला आहे. संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आणखी दोन एनडीआरफची पथके दाखल झाली आहेत. सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून १०२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ३७ मार्ग बंद झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आंबेवाडी, चिखली यासह अनेक गावातील लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here