म.टा. प्रतिनिधी, नगरः करोना अटोक्यात आणण्यासाठी गावोगावी स्थानिक लॉकडाउनसारखे उपाय गावकरी करीत आहेत. अशी ओळख असलेल्या मढी देवस्थानने मात्र श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथाचे नऊ दिवसांचे पारायण सुरू केले आहे. यामुळे देशातीलच नव्हे तर विश्वातील करोनाचे उच्चाटन होईल, या श्रद्धेने पारायण सुरू केल्याचे ट्रास्टतर्फे सांगण्यात आले.

करोनाच्या संकटामुळे सध्या मंदिरेही बंद ठेवण्यात आलेली आहेत. पाथर्डी तालुक्यातील मढी हे देवस्थान भटक्यांची पंढरी म्हणून ओळखले जाते. होळी ते रंगपंचमी या काळात तेथे यात्रा भरते. यावर्षी यात्रा संपली आणि लॉकडाऊन झाला. तेव्हापासून हे मंदीर बंदच आहे. आता श्रावण महिन्याच्या निमित्ताने तेथे नऊ दिवसांचे ग्रंथ पारायण सुरू करण्यात आले आहे. यासंबंधी कान्होबा उर्फ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी सांगितले की, विश्वातील महामारी करोनाच्या संकटापासून जनतेचे संरक्षण होण्याच्या सद्भावनेने व श्रध्देने श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथाचे नऊ दिवसांचे पारायण सुरू केले आहे. करोनाचे विश्वामधून समूळ निवारण व्हावे, अशी प्रार्थना श्रीनवनाथांना करण्यात आली. या पारायण सोहळ्याची सांगता गोकुळाष्टमीच्या दुस-या दिवशी (१२ ऑगस्ट ) होणार आहे.

वाचाः

दररोज चालणारे पारायण, आरती व महाअभिषेक सोहळा भाविकांना आपल्या घरी बसूनच देवस्थानच्या फेसबुकवर लाईव्ह पाहण्यास मिळत आहे. भक्तांनी आपआपल्या घरी श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण संकल्पपूर्वक करावे, असे आवाहन विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष सुनील सानप, विश्वस्त आप्पासाहेब मरकड आणि मिलिंद चवंडके यांनी केले आहे.

वाचाः

मढी येथे नाथसंप्रदायातील कानिफनाथांची समाधी आहे. नाथपंथीयांना सिध्दी प्राप्त असून ते अनेक प्रकारचे चमत्कार घडवून आणू शकतात, अशी समजूत आहे. भारतात आणि महाराष्ट्रात या पंथाला महत्त्वाचे स्थान आहे. मढीच्या बाबतीतही अशा अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. या पार्श्वभूमिवर तेथे आता करोनाचे उच्चाटन करण्यासाठी पारायण सुरू करण्यात आल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here