मुंबई :सराफा व्यावसायिकांचा आकडा तीन लाख आणि या व्यावसायिकांकडील दागिन्यांवर हॉलमार्किंगचे कोंदण करणाऱ्या केंद्राची संख्या फक्त १००, ही मुंबई शहर व उपनगरांची स्थिती आहे. केंद्र सरकारने १ एप्रिलपासून सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग अनिवार्य केले असले तरी, त्यासंबंधी सोयी व पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे सोनेखरेदी करणाऱ्या ग्राहकांपुढेही मोठीच अडचण उभी राहण्याची शक्यता आहे.सोनेखरेदीचा सर्वात मोठा दिवस असलेला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त जवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे ग्राहक दागिने खरेदीची तयार करीत असताना हॉलमार्क हा कळीचा मुद्दा झाला आहे. मुंबईतील सराफा व्यावसायिकांसाठी मात्र ही डोकेदुखी ठरली आहे. याबाबत मुंबई ज्वेलरी असोसिएशचे उपाध्यक्ष व इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशनचे प्रवक्ते कुमारपाल जैन यांनी सांगितले की, ‘मुंबईत तीन लाखांहून अधिक छोटे-मोठे सराफा व्यावसायी आहेत.

अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी, सोन्याचा भाव ६० हजाराच्या आत…
महत्त्वाचे म्हणजे, हॉलमार्किंगबाबत सर्वच व्यावसायिकांना पुरेशी माहिती आहे, असे नाही. त्यांना आम्ही प्रयत्नपूर्वक ही माहिती करून देण्याची तयार करीत आहोत. परंतु मुंबईत हॉलमार्किंग करणाऱ्या केंद्रांचा आकडा फारच कमी आहे. सराफांनी हॉलमार्क केंद्राकडे दागिने पाठवले तरी ते वेळेत परत मिळत नाहीत. मुंबई हा देशाच्या सोने उलाढालीचा हब आहे. त्या स्थितीत मुंबईतील केंद्राचा आकडा किमान दुप्पट करण्याची गरज आहे.’

मुंबईतील एकूण १०० केंद्रांपैकी ७५ केंद्र मुंबई शहर जिल्ह्यात तर २५ केंद्र उपनगर जिल्ह्यात आहेत. सराफा व्यावसायिकांनुसार, एक ज्वेलर महिन्याला सरासरी ५ हजार दागिने हॉलमार्क करायला देतो. एका दागिन्यावर हॉलमार्किंग शिक्क्याचे कोंदण करण्यासाठी किमान १ तास लागतो. त्यानुसार १०० केंद्रांचा आकडा फारच कमी आहे. महामुंबईचा विचार केल्यास, ठाण्यातील हा केंद्रांचा आकडा १४, रायगड पाच व पालघरमध्ये फक्त चार आहे.

Gold Buying: बाळगलेले सोने वापरण्याकडे ग्राहकांचा कल
हॉलमार्किंग म्हणजे काय?
सोन्याची गुणवत्ता, त्याची शुद्धता, नेमके वजन याचे प्रमाणीकरण हॉलमार्किंगद्वारे होते. त्यासाठी भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) केंद्र निश्चित केली आहेत. दागिन्यांवर हॉलमार्किंगचे कोंदण होते त्यावेळी संबंधित केंद्राची खूण, शुद्धतेचा क्रमांक व वजन नमूद केले जाते. हे बघूनच ग्राहकांनी खरेदी करणे आवश्यक आहे.

हॉलमार्किंग अंतर्गत शुद्धतेचे मानक
क्रमांक शुद्धता (टक्क्यांत) कॅरेट

३७५ ३७.५० ९

५८५ ५८.५० १४

७५० ७५.०० १८

९१६ ९१.६० २२

९९० ९९.०० २३

९९९ ९९.९९ २४

अक्षय्य तृतीया विशेष: सोनेखरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

जुन्या दागिन्यांच्या तपासणीची सोय
हॉलमार्किंग अनिवार्य केल्यानंतर जुन्या दागिन्यांचे काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी विशेष यंत्र सोनारांकडे असते. अनेकदा ग्राहक जुने दागिने मोडून नवीन करतो. असे करताना त्या सोनाराला हे दागिने स्वत:च्या डोळ्यासमोर वितळविण्यास सांगावे. त्यानंतर सर्व दागिन्यांची एकत्रित अशी पट्टी तयार होते. या पट्टीची शुद्धता व वजन विशेष यंत्राने तपासणीची सोय सराफांकडे असते. ते करून मग त्यानुसार जुन्या सोन्याची १०० टक्के वजावट मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here