आनंदनगर भागात चोरट्यांनी पाच सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज लांबविला. याबाबत आनंदनगर भागातील दत्त सोसायटीतील एका ज्येष्ठ महिलेने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सदनिका बंद करून बाहेर गेल्या होत्या. चोरट्याने तक्रारदाराच्या सदनिकेचे कुलूप तोडून सोने-चांदीचे दागिने, रक्कम असा सव्वा चार लाख रुपयांचा ऐवज लांबविला. आनंदनगर भागातील कापरे गार्डन सोसायटीतील चार सदनिकांचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदनिकेतून नेमका किती ऐवज लांबविण्यात आला, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. सदनिका मालकांनी अद्याप पोलिसांकडे तक्रार दिलेली नाही.
बँकेतून एक लाख लांबवले
बँकेत पैसे भरणा करण्यासाठी गेलेल्या महिलेकडील एक लाख रुपयांवर चोरट्याने डल्ला मारला. या प्रकरणी हडपसर येथील महिलेने लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला व पती कॅम्प येथील महात्मा गांधी रस्त्यावरील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या होत्या. त्या वेळी चोरट्याने बँक कर्मचारी असल्याची बतावणी केली आणि त्यांच्याकडे पॅनकार्ड मागितले. महिलेचा पती पॅनकार्डची झेरॉक्स काढण्यासाठी बाहेर गेला असता, चोरट्याने त्या महिलेला पैसे भरण्याचा अर्ज आणण्यास पाठवले. त्याच काळात त्याने महिलेकडील रक्कम घेतले आणि भरणा केंद्रात ठेवल्याचे सांगत पोबारा केला. बँकेतच अशाप्रकारे चोरी झाल्याने गोंधळ उडाला. संबंधित व्यक्ती बँकेची कर्मचारी नसल्याचे स्पष्ट झाल्याने महिलेने पोलिसांत तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक मनीषा वलसे तपास करीत आहेत.
मार्केट यार्डात दुकान फोडले
मार्केट यार्ड येथील किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दोन लाख रुपये लंपास केले. याबाबत एका व्यावसायिकाने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. व्यावसायिकाचे भगवती किराणा दुकान बंद असताना दोघा चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेली दोन लाखांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.
पाच लाखांचा ऐवज लंपास
नाना पेठेतील भुसार बाजार परिसरात एका दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच लाख रुपयांचे सिगारेटची पाकिटे चोरून नेली. याबाबत सुरेश चौधरी यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौधरी यांचे नाना पेठेत जय अंबे ट्रेडर्स दुकान आहे. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाच्या लोखंडी दरवाज्याचे कुलूप उचकटले. चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून पाच लाख नऊ हजार रुपयांची सिगारेटची पाकिटे ठेवलेली खोकी चोरून नेली.