वाराणसी:इंजीनिअरिंग पूर्ण केलं, मल्टीनॅशनल कंपनीत कामाला लागला. पण, एका वर्षातच तरुणाने मृत्यूला कवटाळलं. या तरुणाने प्रेम, कर्ज, आर्थिक परिस्थितीमुळे नाही तर त्याला शेती करु दिली नाही म्हणून आत्महत्या केली आहे. इंजीनिअरिंग केल्यानंतर त्याला शेती करायची होती पण त्याची ही इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून त्याने गंगेत उडी घेत आपलं आयुष्य संपवलंय या तरुणाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.वाराणसीच्या मिर्झामुराद पोलीस स्टेशनच्या गोरे गावातील रहिवासी पुष्पेंद्र सिंह यांचा मृतदेह गंगेच्या काठावर सापडला होता. मृत तरुण पुष्पेंद्र याचं वय अवघं २७ वर्षे होतं. माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. पुष्पेंद्रला ढोबळी मिरचीची शेती करायची होती. पण, कुटुंबीयांनी नकार दिल्याने तो रागावून घरातून निघून गेला. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याची तक्रार मिर्झामुराद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. यानंतर त्याने गंगेत उडी घेत आत्महत्या केली असल्याची भीती व्यक्त केली जात होती.
कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पाहणीनंतर केलेल्या विधानाने सत्तार चर्चेत
पुष्पेंद्रने ग्रेटर नोएडा गलगेटिया इन्स्टिट्यूटमधून बीटेकचं शिक्षण घेतलं. त्यानंतर तो एका मल्टीनॅशनल कंपनीत कामालाही लागला. मात्र, वर्षभर काम केल्यानंतर तो पुन्हा घरी परतला आणि त्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. त्याला त्याच्या वडिलोपार्जित जमिनीवर ढोबळी मिरचीची लागवड करायची होती. त्याने वडिलांसोबत शेतीबद्दल चर्चा केली आणि त्याला ढोबळी मिरचीची शेती करायची असल्याचं सांगितलं. त्यासाठी तो वारंवार मातीचं परिक्षण करण्याबाबतही बोलत राहायचा. पण, वडिलांनी त्याला शेती करण्यास स्पष्ट नकार दिला.त्यामुळे पुष्पेंद्र संतापला आणि रागाच्या भरात घरातून निघून गेला. त्यानंतर थेट त्याचा मृतदेह गंगेच्या काठावर सापडला.