स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. त्यांनी यापूर्वी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. कोकणात महाड येथे उद्धव ठाकरे यांची ६ मे रोजी जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेत हा प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. माजी खासदार अनंत गीते यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
महाडचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांच्यासमोर स्नेहल जगताप यांना उमेदवारी उद्धव ठाकरे यांच्याकडून दिली जाण्याची शक्यता आहे. महाडच्या सभेवर पुढील विधानसभा निवडणुकीत भरत गोगावले विरुद्ध स्नेहल जगताप हा सामना रंगणार का हे निश्चित होऊ शकतं.
काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप एकेकाळचे मोठे प्रस्थ होते. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत जगताप यांचा जवळपास २२ हजार मतांनी पराभव झाला होता. भरत गोगावले यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यावेळी जगताप यांचा पराभव करण्यात राष्ट्रवादीच्याही काही नेत्यांनी हातभार लावल्याचे बोलले जाते.
महाड काँग्रेस मधील जगताप घराण्यातील स्नेहल जगताप या काँग्रेसच्या चेहरा आहेत. मात्र, आता त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. मतदारसंघातील काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची त्यांना साथ मिळणार का हे पाहावं लागेल. स्नेहल जगताप यांचा शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय हा काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याचे मानले जाते.
या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत महाड विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे स्नेहल जगताप यांना उमेदवारी दिल्यास महाडमध्ये स्नेहल जगताप विरुद्ध भरतशेठ गोगावले यांच्यात लढत होऊ शकते. स्नेहल जगताप यांचे वडील माणिकराव जगताप यांच्या नावाचा आणि त्यांच्या पश्चात सहानुभूतीचा फायदा होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.