या बाबत महिलेनं कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. विश्वास भापकर (रा. सुप्रीम हाईट्स साळुंके विहार रोड, कोंढवा, पुणे) असं या गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे ही घटना १९ एप्रिल रोजी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विश्वास भापकर याचे घर फिर्यादी यांच्या सोसायटीच्या पार्किंगला लागूनच आहे. त्यामुळे तो सतत पार्किंगच्या कारणावरून फिर्यादी आणि सोसायटीमधल्या इतर व्यक्तींसोबत नेहमी वाद घालतो आणि धमकावत असतो. तो रिकव्हरी एजेंट असून त्याच्या विरोधात तक्रार देण्यास सोसायटीमधले लोकं घाबरतात.
१९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाचेच्या सुमारास फिर्यादी महिला ही कामावरून घरी परतत असताना आरोपी विश्वास याच्या घराच्या गेटवर गाडीची धडक लागली. हे पाहून आरोपी विश्वासला राग आला. या दरम्यान फिर्यादीने झालेल्या चुकीची माफी देखील मागितली. परंतु आरोपीने काहीही न ऐकता फिर्यादी महिलेचे हात पकडून कानशिलात लगावली.
याचा जाब विचारला असताना त्याने पुन्हा महिलेची गचांडी पकडून फिर्यादीच्या कानशिलात लगावली. आरोपीने झटापट करत महिलेला ढकलून देण्याच्या उद्देशाने स्पर्श करून तिचा विनयभंग देखील केला. “जा तुला काय करायचं ते कर, माझं कोणी काही वाकड करू शकत नाही”, असं बोलून तिथून निघून गेला. या घटनेनंतर फिर्यादी महिलेला डाव्या कानाने ऐकायला येत नव्हते. या प्रकरणी महिलेनं कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, या प्रकरणी आरोपीवर विनयभंगाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.