मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली :राजधानी दिल्लीसह उत्तरेतील उष्णतेच्या विक्रमी लाटेबरोबर देशाच्या पश्चिम-दक्षिण भागांमध्ये अवकाळी पावसाचा दणका, ही परिस्थिती म्हणजे वैश्विक तापमानवाढीचा एक परिणाम असला तरी वातावरणातल्या या अचानक बदलांना स्थानिक घटकही तेवढेच जबाबदार असतात. वातावरणाचा हा लहरीपणा आगामी वर्षांमध्ये वाढत जाण्याची चिन्हे आहेत, असे हवामान तज्ज्ञांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ ला सांगितले.दिल्लीसह बहुतांश उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम असून कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा व पुढच्या आठवड्यात हलका पाऊसही पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. किमान आठवडाभर उष्णतेपासून दिलासा मिळण्याची आशा नाही. हवामान खात्याने या उन्हाळ्यात ईशान्य आणि मध्य भारतातील बहुतांश भाग आणि वायव्य भारतातील काही भागांमध्ये सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमानाचा अंदाज व्यक्त केला आहे. देशाच्या बहुतांश भागांमध्ये यावर्षी तुलनेने कडक उन्हाळा असेल आणि पुढचे किमान अडीच महिने सर्वाधिक उष्णतेच्या लाटांचा अनुभव येईल. यात मुंबईसह महाराष्ट्रही असेल. ‘आयएमडी’चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांच्या मते एप्रिल, मे आणि जून या काळात दिल्लीतच नव्हे; तर विंध्याचलाच्या वरच्या पट्ट्यात तीव्र उन्हाळा जाणवेल. दिल्लीसह काही ठिकाणी अधूनमधून येणाऱ्या अवकाळी पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. यंदा उष्णतेची लाट इतकी तीव्र आहे की, त्रिपुरासारख्या राज्याला ही ‘नैसर्गिक आपत्ती’ घोषित करावी लागली याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशात एल निनोचा प्रभाव उत्तर व मध्य भारतापासून केरळपर्यंत जाणवू लागल्याचेही महापात्रा यांनी नमूद केले.

शहरी हवामानशास्त्र हा विषय आपल्याकडे अजूनही दुर्लक्षित असल्याचे मत ‘आयएमडी’चे निवृत्त महासंचालक डॉ. रंजन केळकर यांनी मांडले. ‘साऱ्या गोष्टी वैश्विक तापमानवाढीशी सरसकटपणे जोडण्याचा अट्टहास टाळायला हवा. गेल्या १०० वर्षांत वैश्विक तापमानात एक डिग्री सेल्सिअसने वाढ झाली आहे; पण भारतातील उन्हाळा-पावसाळा यांच्या लहरीपणाचे ते ठळक मापक ठरू शकत नाही. एल निनो गेल्या अनेक वर्षांत अनेकदा प्रभावी ठरला तरी त्यामुळे दरवर्षी कमी पाऊस झाला किंवा दुष्काळ पडलाच असे झालेले नाही’, असे केळकर यांनी ‘मटा’ला सांगितले. त्यांच्या मते दिल्लीचाच विचार केला, तर मुळात दिल्लीची भौगोलिक रचना वेगळी आहे. दिल्लीच्या बाजूला एनसीआरचा विस्तार, वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण करणाऱ्या मेट्रोचा विस्तार, लाखो वाहनांचा धूर, अधिकाधिक आकुंचन पावणारे यमुनेचे पात्र, एकेकाळी घनदाट झाडांनी गच्च असलेल्या ल्युटियन्स दिल्लीमध्ये हजारोंच्या संख्येने झाडे कापली जाणे यासारख्या स्थानिक घटकांचाही फार मोठा परिणाम दिल्लीच्या उन्हाळ्याची तीव्रता वाढण्यावर होत आहे. दिल्लीतील चटका बसविणारे गरम वाऱ्याचे झोत म्हणजे ‘लू’ आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे ठरतात. दिल्लीसह उत्तर भारत शीत कटिबंधात असूनही उन्हाळा विक्रम मोडतो त्याला स्थानिक कारणेही जबाबदार आहेत. महाराष्ट्रात मान्सून पश्चिमेकडून येतो, तर दिल्लीत तो पूर्वेकडून येऊन राजस्थानपर्यंत जातो. मात्र मान्सून अनेकदा दिल्लीला वळसा घालूनही राजस्थानात जातो. त्यामुळे दिल्लीत पाऊस नव्हे; तर वादळी पाऊस होण्याचे प्रमाण जास्त असते. उत्तरेकडचे थंड वारे व पश्चिम भारतातले उष्ण वारे एकमेकांना भिडले की, अवकाळी पावसाची शक्यता जास्त असते, असेही डॉ. केळकर म्हणाले.

महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ कायम राहणार; या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह कोसळणार
पुण्यात पावसाची हजेरी

पुणे :विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी शहरात पुन्हा हजेरी लावली. काही ठिकाणी गारांसह पाऊस पडला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. पुढील तीन दिवस पारा ४० अंशांवर पोहोचण्यासह दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

महाराष्ट्र भूषण सोहळ्यात सूर्य कोपला! तापमान होतं ४० ते ४८ अंश सेल्सिअस, तज्ज्ञ म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here