मुंबई:खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे १४ श्रीसेवकांचा मृत्यू झाला होता. यावरुन सध्या बराच गदारोळ सुरु आहे. याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि खरी परिस्थिती समोर आणली जावी, यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र भूषण सोहळ्यात श्रीसेवकांची योग्य ती काळजी का घेण्यात आली नाही, असा सवालही विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता एक नवीन माहिती पुढे येताना दिसत आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून उष्मालाटेसंदर्भात काही सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, एकूण परिस्थिती पाहता या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करुन खारघरमध्ये कार्यक्रम घेण्यात आल्याचे दिसत आहे . आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या या सूचनांचे पालन झाले असते तर कदाचित १४ श्रीसेवकांचे जीव वाचण्याची शक्यता होती.

यंदा देशभरात उष्णतेचे प्रमाण वाढणार असून, सरसकट २ अंश सेल्सियसने उष्णाता जास्त वाढणार आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. त्यादृष्टीने केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता व स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. यानंतर राज्य सरकारने २९ मार्चला उष्मालाट कृती आराखडा जाहीर केला होता.

Kharghar Tragedy: तहानेने जीव कासावीस, नळांमधून गरम पाणी; टँकरभोवती उसळलेल्या गर्दीने श्रीसेवकांचा जीव घुसमटला

१ मार्च ते १५ जून या कालावधीसाठी तयार करण्यात आलेल्या या आराखड्यात उष्मालाटेमुळे होणाऱ्या परिणामाचा मुकाबला करण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना काय काय करायच्या याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचनांचा समावेश त्यात करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या सहीने हा कृती आराखडा प्रसिद्ध झाला होता. राज्यातील उष्णतेची लाट पाहता या कृती आराखड्याची गांभीर्याने अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. परंतु, खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण सोहळा आयोजित करताना उष्मालाटेविषयी विचार करण्यात आला होता का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कार्यक्रमाच्या वेळेपासून ते श्रीसेवकांची गैरसोय अशी सर्वच गणितं चुकत गेली. ज्यादिवशी खारघरमध्ये हा कार्यक्रम पार पडला तेव्हा नवी मुंबईमध्ये ३७ अंश सेल्सिअस तापमान होते. हवेत आर्द्रताही अधिक होती. लाखोंचा जनसागर एकत्र आल्याने उष्णता आणि आर्द्रता वाढली. कार्यक्रम वेळेत सुरु न झाल्यामुळे पुढे तो लांबला. यामुळे आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांना म्हणजेच श्री सेवकांना तब्बल पाच तास रणरणत्या उन्हात बसावे लागले. त्यामुळेच श्रीसेवक उष्माघाताला बळी पडले.

श्रीसेवकांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक गोष्टी, खारघर दुर्घटनेत ५० हून अधिक मृत्यू: संजय राऊत

भविष्यात सोहळे आयोजित करताना राज्य सरकार काळजी घेणार

खारघर दुर्घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. इतकी मोठी दुर्घटना ही सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेसाठी मोठा धडा ठरला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खारघर दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांची एक सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती महिनाभरात खारघर दुर्घटनेचा अहवाल सादर करेल. भविष्यात अशा सोहळ्याच्या आयोजनावेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबतही समिती सरकारला शिफारशी करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here