म. टा. प्रतिनिधी, मुंबई :पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाला मोठा इतिहास आहे. तथापि, विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत अधिसभा भरण्याच्या ठिकाणी अश्लिल भाषेतील रॅप साँगचे चित्रीकरण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हा प्रकार निंदनीय असून, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नावलौकिकाला काळिमा फासणारा आहे. याची शासनस्तरावर दखल घेण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्राद्वारे केली आहे.सावित्रीबाई फुले विद्यापीठातील कुलगुरुंच्या खुर्चीवर बसून समोरच्या टेबलवर दारूची बाटली आणि शस्त्र ठेऊन शुभम जाधव या गायकाने रॅप साँग चित्रित केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या प्रकाराबाबत पुण्यातील चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठाने या प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्ती केली आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये खास करून शैक्षणिक क्षेत्रात संतापाची भावना आहे. पोलिस तपास आणि चौकशी समितीचा अहवाल प्राप्त करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी पवार यांनी राज्यपालांकडे केली आहे. मी फक्त शरद पवारांचं ऐकतो, अजित पवारांच्या टीकेला संजय राऊतांकडून प्रत्युत्तर तसेच, भविष्यात कोणत्याही विद्यापीठात अथवा शैक्षणिक संकुलात असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी मार्गदर्शक सूचना द्याव्यात असेही पवार यांनी म्हटले आहे.